
जेरुसलेम, 18 ऑगस्ट (हिं.स.)। पश्चिम आशिया विषयक प्रमुख वाटाघाटीकार म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर यांनी सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली. तब्बल तीन तास चाललेल्या चर्चेनंतरही गाझामधून इस्रायली सैन्याची माघार घेण्याबाबत कुशनर यांना नेतन्याहू यांच्याकडून ठोस आश्वासन मिळू शकले नाही. हमासला नि:शस्त्र करून गाझाचे लष्करीकरण पूर्णपणे संपेपर्यंत इस्रायली सैनिक गाझामधून माघार घेणार नाहीत, असे नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे.
ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला पुढे नेण्यासाठी कुशनर आणि नेतन्याहू यांच्यात ही चर्चा झाली. या बैठकीला कुशनर यांच्यासोबत ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी अधिकारी निकोलाय मेलादेनोव्ह हेही उपस्थित होते.यापूर्वी कुशनर यांनी कैरो येथे हमासचे प्रमुख खलील अल-हय्या यांच्यासोबत दोन तास चर्चा केली होती. हमासच्या प्रमुखांनी शस्त्रे खाली ठेवण्याची आणि गाझातील सत्तेतून बाजूला होण्याची अट मान्य केली. मात्र, त्यापूर्वी गाझावरील इस्रायली हल्ले थांबवावेत आणि इस्रायली सैन्याने गाझामधून माघार घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, गाझाच्या ६० टक्क्यांहून अधिक भूभागावर इस्रायली सैन्याचा ताबा असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेदरम्यान इजिप्त, कतार आणि तुर्कियेचे प्रतिनिधीही उपस्थित होते.या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने संयुक्त निवेदन जारी करून शांतता योजना नाकारल्याबद्दल इस्रायलवर टीका केली आहे. या निवेदनावर जॉर्डन, पाकिस्तान आणि इंडोनेशियाच्या प्रतिनिधींनीही स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
शांततेसाठी चर्चा सुरू असतानाच इस्रायलचे कट्टर उजव्या विचारसरणीचे गृहमंत्री इतामार बेन-ग्विर यांच्या वक्तव्याचीही चर्चा होत आहे. त्यांनी सरकारकडे गाझामध्ये दररोज ३० ते ४० लोकांना ठार मारण्यासाठी इस्रायली सैन्याला निर्देश देण्याची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode