
लंडन, 18 ऑगस्ट (हिं.स.)पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार बाबर आझम हाताच्या दुखापतीमुळे मालिकेतील पहिला सामना खेळू शकणार नाही अशी चर्चा आहे. बाबरच्या पहिल्या कसोटीतील अनुपस्थितीमुळे संघाचे कर्णधारपद कोण भूषवणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवारी प्रोफेशनल काउंटी क्लब सिलेक्ट इलेव्हनच्या दौऱ्यावरील सामन्यादरम्यान फलंदाजी करताना, वेगवान गोलंदाज मॅनी लम्सडेनचा एक चेंडू बाबरच्या उजव्या हाताला लागला. दुखापतीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून बाबर आझम ५ धावा करून मैदानाबाहेर गेला, त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील त्याच्या सहभागाबद्दल शंका निर्माण झाली आहे. बाबरने आतापर्यंत फक्त थ्रो-डाउन्सद्वारे थोडी फलंदाजी केली आहे, नेटमध्ये नाही.
बाबरने त्याच्या हाताला वेदना होत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे, तो बुधवारी मैदानात उतरण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याच्या अनुपस्थितीत, शान मसूद किंवा सलमान आगा संघाचे नेतृत्व करतील, पम अंतिम निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी घेतील. सलमान आगा पाकिस्तानचा टी-२० कर्णधार आहे, पम त्याला दीर्घ फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव नाही, त्यामुळे ही जबाबदारी मसूदला दिली जाण्याची शक्यता आहे.
इतिहास आणि हेडिंग्ले येथील इंग्लंडचा अलीकडील फॉर्म, या दोन्ही गोष्टी पाकिस्तानच्या विरोधात आहेत. यजमानांविरुद्ध खेळलेल्या १० कसोटी सामन्यांपैकी पाकिस्तानने केवळ एक सामना जिंकला असून सहा गमावले आहेत. पाकिस्तानने २०१० मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक कसोटी सामना खेळला होता आणि तो सामना जिंकला होता. यजमान इंग्लंडने या मैदानावर आपले शेवटचे सहा कसोटी सामने जिंकले आहेत आणि या मैदानावर त्यांचा शेवटचा पराभव २०१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे