
- १० लाख रुपयांचा दंड आणि तीन वर्षाचा कारावास
- आजपासून सुट्टे खाद्यतेल विक्रीवर पूर्णपणे बंदी
- अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यतेल विक्रीबाबत नवा आदेश जारी
मुंबई, 20 ऑगस्ट (हिं.स.) - 'सेफ फूड , सेफ महाराष्ट्र' या अंतर्गत आपण काम करत आहोत. आता आपण काही कंप्लायंस ऑर्डर काढत आहोत. आधी आपण हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मिल्क प्रोडक्टबाबत ऑर्डर काढली आहे. राज्यातील शाळांच्या बाबतीतही कंप्लायंस ऑर्डर काढली होती. या सर्वांच्या अंमलबजावणी सुरू आहे. आता या मोहिमेच्या अंतर्गत पुढचा टप्पा खाद्यतेलाच्या बाबतीत आहे. या संदर्भातील पुढील कंप्लायंस ऑर्डर आपण आजपासून जारी करत आहोत. या अंतर्गत यापुढे सुटे खाद्यतेल विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. सुटे खाद्यतेल आणि तेलात भेसळ करताना आढळल्यास १० लाख रुपयांचा दंड आणि तीन वर्षाचा कारावास होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. या संदर्भात मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, खाद्यतेल सर्वांच्या घरात असते. हे खाद्यतेल आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी लागते. २०११ च्या कायद्यानुसार लायसन्स असणे किंवा रजिस्ट्रेशन असणे आणि फूड प्रॉड्क्टच्या बाबतीत जे नियम आहेच ते पाळणे त्यानुसार खाद्यतेलाचे प्रोडक्शन होणे आणि विक्री करणे गरजेचे आहे. मागील काही दिवसात खाद्यतेलाच्या बाबतीत गंभीर बाबी आढळल्या आहेत. खाद्यतेलाची इंडस्ट्रीमध्ये पॅकेजिंग असेल किंवा लेबल किंवा ब्रँडवर काम करणाऱ्या आस्थापना, या सर्वांबाबत आमच्या 10 ते 12 गोष्टी निदर्शनास आल्या आहेत आणि यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. यापुढे सुटे खाद्यतेल विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. भेसळ केल्याचे प्रकार आम्हाला आढळून आलेत. मोहरी तेल जे आहे, त्याचंही अनधिकृत मिश्रण करण्याचे प्रकार आढळून आले आहेत. फक्त मोहरीचं तेल विकता येतं, पण मोहरीचं तेल मिश्रण करून विकता येत नाही. त्यामुळे यापुढे सुटे खाद्यतेल आणि तेलात भेसळ करताना आढळल्यास मोठी कारवाई होणार आहे. भेसळ करताना सापडल्यास १० लाख रुपयांचा दंड आणि तीन वर्षाचा कारावास होणार असल्याची माहिती मुंढे यांनी दिली.
खाद्यतेलात भेसळ होत असून त्यात आरोग्यास घातक असणाऱ्या ट्रान्सफॅट्सचे प्रमाण जास्त आढळून आले. तेलाचा मूळ स्रोत आणि एक्सपायरी डेट लपवून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. गंज लागलेल्या डब्यात तेल साठवून ठेवल्याचेही निदर्शनास आले आहे, यामुळे आता अशा गोष्टी निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे, असा इशाराही मुंढे यांनी दिला. घातक प्लास्टिकचा देखील वापर तेलाच्या पॅकिंगसाठी केला जात आहे. या सर्वबाबी लक्षात आल्यानंतर एफडीने नवीन नियमावली जारी करत कारवाईचा इशारा दिला. यापुढे राज्यभरातील दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्य तेलाच्या पाकिटावर स्रोत आणि एक्सपायरी डेट असणं अनिवार्य करण्यात आले असल्याचेही मुंढे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी