
सुप्रीम कोर्टात ठाकरेंची बाजू भक्कम झाल्याचा सावंतांचा दावा
मुंबई, 20 ऑगस्ट (हिं.स.) : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षाची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, गुरुवारी सुनावणीच्या सातव्या दिवशी ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. देवदत्त कामत यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद केला. पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील मूलभूत फरक स्पष्ट करताना त्यांनी देशातील विविध राज्यांतील महत्त्वाच्या न्यायालयीन निकालांचा दाखला दिला. आमदार अपात्रतेचा निर्णय पुन्हा निवडणूक आयोगाकडे न पाठवता सर्वोच्च न्यायालयानेच त्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यापूर्वी ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी प्रभावी युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज ऍड. कामत यांनी युक्तिवाद पुढे नेत पक्षाची रचना, पक्षाचे अस्तित्व आणि विधिमंडळातील सदस्य यांच्यातील संबंधांवर महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. तर आज, ऍड.
कामत यांनी उत्तर प्रदेश, केरळ, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील न्यायालयीन प्रकरणांचा संदर्भ देत राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे एकच नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पक्षातील काही आमदार किंवा नेते दुसऱ्या गटात गेल्याने संपूर्ण राजकीय पक्षच संपुष्टात येत नाही, असा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे.
पक्षचिन्हाच्या मुद्द्यावरही कामत यांनी महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. पक्षातील एखादा गट बाहेर पडला किंवा एखाद्या व्यक्तीसोबतचे आमदार दुसऱ्या बाजूला गेले, म्हणून त्या व्यक्तीलाच पक्षाचा प्रमुख किंवा पक्षाचा वारसदार मानता येईल का, असा सवाल त्यांच्या युक्तिवादातून उपस्थित करण्यात आला. यावेळी सादिक अली आणि सुभाष देसाई प्रकरणांचाही संदर्भ देण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.
या युक्तिवादावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत यांनी ऍड. देवदत्त कामत यांनी आजच्या सुनावणीत युक्तिवादाचा ‘कळस’ चढवल्याचे म्हटले. न्यायालय कामत यांच्या मांडणीने प्रभावित झाले असेल, तर आपल्याला आनंद असल्याचेही सावंत म्हणाले.
“पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यात फरक आहे. पक्ष हा निरंतर असतो. पक्षातील माणसं गेली म्हणजे पक्ष जात नाही,” अशी भूमिका सावंत यांनी मांडली. आमदार अपात्रतेचा निर्णय आणि पक्षचिन्हाचा वाद पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठवू नये, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार अपात्र ठरल्यास पक्ष आणि चिन्हाचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असा दावाही सावंत यांनी केला. त्यामुळे अंतिम निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागेल आणि पक्षासह ‘धनुष्यबाण’ चिन्हही आपल्यालाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिंदे गटाने मात्र ठाकरे गटाच्या युक्तिवादावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटावर न्यायव्यवस्थेवरील विश्वासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“उबाठाचा विश्वास निवडणूक आयोगावर नाही, विधीमंडळ अध्यक्षांवर नाही आणि यापूर्वीच्या निकालावरही नाही. उद्या निकाल ठाकरे यांच्या विरोधात गेला तर कोर्टावरही विश्वास नाही, असे म्हणतील,” अशी टीका वाघमारे यांनी केली.
शिवसेनेच्या पक्षघटनेत 2018 मध्ये करण्यात आलेल्या बदलांचा मुद्दाही वाघमारे यांनी उपस्थित केला. ही घटना योग्य होती की नव्हती, तसेच त्यातील बदल निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले होते की नाही, याबाबत ठाकरे गटाने स्पष्ट भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.ठाकरे गट पक्षात लोकशाही नसल्याचा आरोप करताना वाघमारे यांनी पक्षांतर्गत नाराजीचाही दावा केला. ठाकरे गटाकडे या मुद्द्यांवर ठोस भूमिका नसल्यानेच न्यायालयीन प्रक्रियेत वेगवेगळी उदाहरणे दिली जात असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच, ठाकरे गटाने उच्च न्यायालयातील उदाहरणे दिली असतील तर त्यांनी स्वतः उच्च न्यायालयात दाद का मागितली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिवसेनेतील दोन्ही गटांकडून परस्परविरोधी दावे सुरू असताना सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. पक्षाची खरी ओळख कोणाची, ‘धनुष्यबाण’ चिन्हावर अधिकार कोणाचा आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत अंतिम निर्णय कोणत्या पद्धतीने घ्यायचा, या प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.त्यामुळे शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरील हक्काचा हा प्रदीर्घ राजकीय आणि कायदेशीर संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे लागला आहे.---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी