जेपी मॉर्गनच्या युनिटसह 2 संस्थांवर सेबीची कारवाई
सेबीने दिले ३.६८ कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश नवी दिल्ली, २० ऑगस्ट (हिं.स.) : शेअर बाजारातील कथित हेराफेरीप्रकरणी भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने (सेबी) जेपी मॉर्गनची युनिट कॉप्थॉल मॉरीशस इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि मानसी शेअर अँड स्टॉक
सेबी लोगो


सेबीने दिले ३.६८ कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश

नवी दिल्ली, २० ऑगस्ट (हिं.स.) : शेअर बाजारातील कथित हेराफेरीप्रकरणी भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने (सेबी) जेपी मॉर्गनची युनिट कॉप्थॉल मॉरीशस इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि मानसी शेअर अँड स्टॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. नियामकाने दोन्ही संस्थांना शेअर बाजारातील व्यवहारांपासून प्रतिबंधित करत गैरप्रकारातून मिळवलेले एकूण ३.६८ कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

सेबीने १३ ऑगस्ट २०२६ रोजी इंडेक्सच्या एक्स्पायरीच्या दिवशी सेन्सेक्समधील क्लोजिंग ऑक्शन सेशन (सीएएस) दरम्यान घोटाळा केल्याच्या आरोपावरून ही कारवाई केली आहे. सेबीच्या अंतरिम आदेशानुसार, या कालावधीत सेन्सेक्सच्या हालचालींमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याचे प्राथमिक पुरावे आढळले.

सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश चंद्र वार्ष्णेय यांनी १९ ऑगस्ट रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला. कथित व्यवहार झाल्यानंतर अवघ्या 6 दिवसांत नियामकाने ही कारवाई केली आहे. आदेशानुसार, कॉप्थॉल मॉरीशसकडून २.९६ कोटी रुपये, तर मानसी शेअर अँड स्टॉक ब्रोकिंगकडून ७१.६५ लाख रुपये जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सेन्सेक्सच्या किंमतीत मोठे चढ-उतार

सेबीच्या सर्व्हिलन्स यंत्रणेला दुपारी ३.२० ते ३.३० या वेळेत सीएएस विंडोदरम्यान सेन्सेक्सच्या इंडिकेटिव्ह इक्विलिब्रियम प्राइस (आयईपी) मध्ये 3 मोठे चढ-उतार आढळले. यामध्ये अनुक्रमे ३६२.०२ अंक, १३२.६७ अंक आणि ४०५.०८ अंकांची हालचाल झाली. ही हालचाल अवघ्या दोन ते २८ सेकंदांच्या कालावधीत झाली.

अखेरीस सेन्सेक्स ७८,०८० अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्ये झालेल्या अशाच हालचालींच्या आधारे सेबीने निर्धारित केलेल्या पातळीपेक्षा हा स्तर सुमारे २४० अंकांनी अधिक होता.

कॉप्थॉलकडून मोठ्या प्रमाणात खरेदीचे आदेश

सेबीच्या आदेशानुसार, बाजारात वेगाने तेजी निर्माण होत असताना ऍग्रेसिव्ह बाय ऑर्डर्सचा मोठा हिस्सा कॉप्थॉल मॉरीशसकडून देण्यात आला होता. एका दोन सेकंदांच्या कालावधीत एकूण खरेदी आदेशांच्या मूल्यामध्ये कॉप्थॉलचा वाटा तब्बल ९९.९१ टक्के होता. दुसऱ्या कालावधीत हा वाटा ९६.०९ टक्के, तर आणखी एका कालावधीत ८५.२१ टक्के होता.

हे खरेदी आदेश संदर्भ किंमतीपेक्षा ३ टक्के अधिक असलेल्या कमाल मर्यादेवर किंवा त्याच्या आसपास देण्यात आले. काही सेकंदांतच हे आदेश जवळपास सर्व सेन्सेक्समधील समभागांमध्ये पसरले.

सेबीच्या म्हणण्यानुसार, किंमतीत बदल झाल्यानंतर कॉप्थॉलने या आदेशांपैकी मोठा हिस्सा रद्द केला. कॉप्थॉलच्या डेरिव्हेटिव्ह्ज पोझिशन्समध्ये सेन्सेक्स ऑप्शन्समधील लाँग कॉल आणि शॉर्ट पुट पोझिशन्सचा समावेश होता. त्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर बंद झाल्यास या पोझिशन्समधून संस्थेला फायदा होण्याची शक्यता होती.

मानसी ब्रोकिंगवरही संशयास्पद व्यवहारांचा आरोप

सेबीला मानसी शेअर अँड स्टॉक ब्रोकिंगकडूनही संदर्भ किमतीपेक्षा लक्षणीय कमी किमतीवर मोठ्या प्रमाणात विक्रीचे आदेश देण्यात आल्याचे आढळले.नियामकाने कथितरीत्या गैरप्रकारातून मिळालेल्या नफ्याची गणना केली आहे. त्यानुसार, कॉप्थॉल मॉरीशसला २.९६ कोटी रुपये, तर मानसी शेअर अँड स्टॉक ब्रोकिंगला ७१.६४ लाख रुपयांचा लाभ झाल्याचे सेबीने म्हटले आहे. या दोन्ही संस्थांकडून ही रक्कम जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande