बांग्लादेशमध्ये सेवानिवृत्त हिंदू शिक्षकाच्या कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू
ढाका , 23 ऑगस्ट (हिं.स.)।बांगलादेशच्या रंगपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सेवानिवृत्त हिंदू शिक्षक गणपती चक्रवर्ती, त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले. कुटुंबीयांशी संपर्क तुटल्यानंतर शनिवारी रात्री
बांग्लादेशमध्ये हिंदू कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू


ढाका , 23 ऑगस्ट (हिं.स.)।बांगलादेशच्या रंगपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सेवानिवृत्त हिंदू शिक्षक गणपती चक्रवर्ती, त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले. कुटुंबीयांशी संपर्क तुटल्यानंतर शनिवारी रात्री पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, घरातील वेगवेगळ्या ठिकाणी चौघांचे मृतदेह आढळले. पोलिस आणि सीआयडीच्या पथकांनी घटनास्थळ सील करून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

वृत्तानुसार, रंगपूर मेट्रोपॉलिटन कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नजमुल कादर यांनी सांगितले की, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी घराचे कुलूप तोडून चौघांचे मृतदेह बाहेर काढले. मृतांची ओळख रंगपूर जिल्हा शाळेचे ६५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक गणपती चक्रवर्ती, त्यांची ५० वर्षीय पत्नी प्रीतिलता चक्रवर्ती, २३ वर्षीय मुलगी अगामी चक्रवर्ती प्रार्थी आणि १२ वर्षीय मुलगा प्रियम चक्रवर्ती अशी झाली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गणपती चक्रवर्ती हे ३१ डिसेंबर रोजी रंगपूर जिल्हा शाळेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांची मुलगी अगामी हिने याच वर्षी रंगपूरच्या कारमायकल कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली होती. तर त्यांचा मुलगा प्रियम हा रंगपूर जिल्हा शाळेत इयत्ता पाचवीत शिकत होता.

गणपती यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, घरातील सदस्यांशी संपर्क तुटल्यानंतर त्यांची चिंता वाढली होती. कुटुंबीयांचे त्यांच्याशी गुरुवारी दुपारी शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोबाइल फोन बंद होते.

कुटुंबातील एका सदस्याने सांगितले, “शनिवारी रात्री त्यांचे फोन बंद असल्याचे पाहून आम्ही दशपाडा येथे पोहोचलो. घराचे मुख्य गेट बंद होते आणि घरातील सर्व दिवेही बंद होते. त्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात चौघांचे मृतदेह आढळले.” सध्या पोलीस आणि तपास यंत्रणा घटनास्थळावरील परिस्थितीची पाहणी करण्याबरोबरच कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांकडून माहिती घेत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या हिंदू कुटुंबातील चौघांचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, हे स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande