
ढाका, 23 ऑगस्ट (हिं.स.)।बांगलादेशने म्हटले आहे की, पंतप्रधान तारिक रहमान यांच्या भारत दौऱ्याबाबत कोणतीही ‘घाई’ नाही. ढाका भारतासोबत सकारात्मक संबंध प्रस्थापित करू इच्छितो; मात्र त्यासाठी आपल्या राष्ट्रीय हितांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हुमायून कबीर यांनी शनिवारी ढाका येथे ही माहिती दिली. कबीर हे पंतप्रधानांचे सल्लागार असून, शुक्रवारी त्यांची परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
तारिक रहमान यांच्या भारत दौऱ्याची वेळ कधी असेल, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर कबीर यांनी सांगितले की, दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये बैठक घेण्यासाठी घाई करण्याची गरज नाही.ते म्हणाले, “जर आपण उद्याच आपल्या राष्ट्रीय हितांच्या आधारे एखाद्या करारावर पोहोचलो, तर आपण पुढील आठवड्यात किंवा त्यानंतरच्या आठवड्यात भारतात जाऊ शकतो. येथे कोणतीही घाई नाही. ”पंतप्रधानस्तरीय दौऱ्यासाठी पुरेशी तयारी, ठोस चर्चा आणि आवश्यक आधार तयार होणे गरजेचे आहे, असे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, दोन्ही देशांमध्ये आधी पुरेशा पातळीवर चर्चा होऊन सहमती निर्माण होणे आवश्यक आहे.
कबीर यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय चर्चेत पुरेशी प्रगती झाल्यानंतर आणि आवश्यक तयारी पूर्ण झाल्यानंतरच तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील. दरम्यान, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या चर्चेतील महत्त्वाचा विषय कायम आहे. त्यामुळे तारिक रहमान यांचा संभाव्य भारत दौरा दोन्ही देशांमधील तणावाचे संबंध सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
कबीर यांची ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नवी दिल्ली दौऱ्याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कबीर म्हणाले, “आम्हाला भारतासोबत सकारात्मक संबंध हवे आहेत. आम्हाला ते का नको असतील? ते आमचे शेजारी आहेत. त्यांच्यासोबत कार्यरत संबंध कायम ठेवणे आवश्यक आहे. ”भारतासह कोणत्याही देशासोबत संबंध ठेवताना बांगलादेशच्या राष्ट्रीय हितांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल आणि ढाका कोणत्याही परिस्थितीत आपल्या हितांशी तडजोड करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारताने बांगलादेशच्या पंतप्रधानांना द्विपक्षीय दौऱ्यासोबतच 12-13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेच्या आउटरीच सत्रात सहभागी होण्यासाठीही आमंत्रित केले आहे. दोन्ही देशांचे संबंध पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी हा संभाव्य दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
भारत-बांगलादेश संबंधांमध्ये अलीकडे पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला, जेव्हा शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीहून आभासी माध्यम संवाद साधला. यावेळी त्यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याचा आपला निर्धार व्यक्त केला.शेख हसीना यांनी केलेल्या माध्यम संवादावर बांगलादेशने तीव्र नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमामुळे बांगलादेशी जनतेच्या भावना दुखावल्या असून, भारत-बांगलादेश संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे ढाकाने म्हटले होते.
भारताने या संपूर्ण घटनाक्रमापासून स्वतःला वेगळे ठेवत नवी दिल्लीची या कार्यक्रमात कोणतीही भूमिका नव्हती आणि शेख हसीना यांच्या वक्तव्यांचे भारताने समर्थन केलेले नाही, असे स्पष्ट केले.
या घटनेनंतर ढाकाने पुन्हा एकदा शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. हा मुद्दा पंतप्रधान तारिक रहमान यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याशी जोडला जाऊ शकतो, असे संकेतही बांगलादेशकडून देण्यात आले.कबीर यांनी शनिवारी सांगितले की, भारत आणि बांगलादेश यांच्यात प्रत्यार्पण करार अस्तित्वात आहे आणि शेख हसीना यांचे प्रत्यार्पण हा दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या चर्चेचा एक भाग आहे.
कबीर यांची ही टिप्पणी अशा दिवशी आली, जेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कोणतेही संबंध यशस्वी होण्यासाठी ते ‘परस्पर हितां’च्या कसोटीवर खरे उतरले पाहिजेत, असे म्हटले. भारताच्या शेजारी देशांशी, विशेषतः बांगलादेशसोबतच्या संबंधांच्या संदर्भात जयशंकर यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode