अमेरिकेतील जंगलांत भीषण आग, ६ जण जखमी; ४२ हजार नागरिकांना स्थलांतराचे आदेश
वॉशिंग्टन, 24 ऑगस्ट (हिं.स.)।नेवाडा-कॅलिफोर्निया सीमेच्या जवळ असलेल्या उत्तर-पश्चिम नेवाडातील रेनो शहराच्या दिशेने जंगलातील आग वेगाने पसरत आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या आगीत किमान सहा जण जखमी झाले आहेत. तसेच, सुमारे ४२ हजार लोकांना परिसर रिका
अमेरिकेतील जंगलांत भीषण आग, ६ जण जखमी; ४२ हजार नागरिकांना स्थलांतराचे आदेश


वॉशिंग्टन, 24 ऑगस्ट (हिं.स.)।नेवाडा-कॅलिफोर्निया सीमेच्या जवळ असलेल्या उत्तर-पश्चिम नेवाडातील रेनो शहराच्या दिशेने जंगलातील आग वेगाने पसरत आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या आगीत किमान सहा जण जखमी झाले आहेत. तसेच, सुमारे ४२ हजार लोकांना परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वृत्तानुसार, ही आग शनिवारी लागली होती. अग्निशमन अधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आग आतापर्यंत १३ हजार एकरांहून अधिक क्षेत्रात पसरली आहे. आग अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही.अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींमध्ये तीन नागरिक आणि तीन आपत्कालीन सेवा कर्मचारी आहेत. याशिवाय, सुमारे ४५ हजार लोक अशा परिसरात आहेत, जिथे कोणत्याही क्षणी परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला जाऊ शकतो.

अधिकाऱ्यांनी आगीत अनेक इमारती आणि इतर बांधकामे नष्ट झाल्याचीही पुष्टी केली आहे. रविवारी वाशो काउंटीमध्ये सुमारे १० हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रेनो हे वाशो काउंटीचे मुख्य शहर आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र आहे.अधिकाऱ्यांच्या मते, आगीचे स्वरूप अत्यंत धोकादायक आणि असामान्य आहे. जोरदार वाऱ्यामुळे कोरड्या आणि सहज पेट घेणाऱ्या वनस्पतींमध्ये आग अतिशय वेगाने पसरत आहे.

नेवाडाचे गव्हर्नर जो लोम्बार्डो यांनी शनिवारी रात्री वाशो काउंटीमध्ये आणीबाणी जाहीर केली. एका निवेदनात लोम्बार्डो म्हणाले, “ही परिस्थिती सतत बदलत असून अतिशय वेगाने गंभीर होत आहे. प्रभावित भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. राज्य सरकार पूर्णपणे सक्रिय असून, नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी, समुदायांचे संरक्षण करण्यासाठी आणि लोकांना धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी आम्ही स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांसोबत मिळून सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करत आहोत.”

गव्हर्नरांनी रविवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा नागरिकांना इशारा दिला. आगीशी संबंधित परिस्थिती अद्याप वेगाने बदलत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभावित भागात असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि परिस्थितीबाबत मिळणाऱ्या ताज्या माहितीकडे सातत्याने लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

यापूर्वी जुलै महिन्यात दक्षिण कॅलिफोर्नियात लागलेली जंगलातील आगही वेगाने पसरून सुमारे २,७०० एकर क्षेत्रात पोहोचली होती. तीव्र उष्णतेच्या लाटेदरम्यान लागलेल्या या आगीमुळे नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande