रत्नागिरी : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार’
रत्नागिरी, 26 ऑगस्ट (हिं.स.) । शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आर्थिक आधार देत आहे. या योजनेचा लाभ घेण्य
रत्नागिरी : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार’


रत्नागिरी, 26 ऑगस्ट (हिं.स.) । शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आर्थिक आधार देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या ऑनलाइन प्रणालीवर अर्ज करणे आवश्यक असून, यंदा अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

वसतिगृहातील मर्यादित जागांमुळे दरवर्षी अनेक पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना शहरात राहून शिक्षण घेता यावे, यासाठी स्वाधार योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.

चालू शैक्षणिक वर्षासाठी योजनेच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून त्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मागील वर्षी योजनेचा लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही पुढील वर्षासाठी लाभ घ्यायचा असल्यास अर्जाचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे.

स्वाधार योजनेसाठी विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. तसेच विद्यार्थ्याने दहावीनंतरच्या व्यावसायिक किंवा बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे. योजनेच्या अन्य पात्रता निकषांची पूर्तता करणेही बंधनकारक आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील १० शासकीय वसतिगृहांमध्ये एकूण ७७१ विद्यार्थ्यांची क्षमता असून, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना पर्याय उपलब्ध करून देते.

स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन अर्ज समाज कल्याण विभागाच्या hms.maharashtra.gov.in या पोर्टलवर करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर असल्याने पात्र विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande