
वर्धा, 26 ऑगस्ट (हिं.स.)।
खेळत असलेल्या ६ वर्षीय अधिराज पाटील याच्या डोक्यावर कावड पडल्याने त्याचा मृत्यू झाला. साेमवारी (ता.२४) राममंदिर, नदीफैल येथे ही घटना घडली. याप्रकरणी सुधीर क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी आज श्री शिवशंकर कावड यात्रा समितीचे आयोजक मंडले व आयोजन समितीवर गुन्हा दाखल करण्यात आला. येथील श्री शिवशंकर कावड यात्रा समितीच्या वतीने साेमवारी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास कावड यात्रा श्रीराम मंदिरात आली. येथे पूजा अर्चा झाल्यानंतर सकाळी ११ ते ११.२० या दरम्यान, सोहम भगत यांच्या दुकानाजवळ कावड यात्रा थांबविण्यात आली. कावड यात्रा स्टॅण्डवर उभी ठेवून डीजेच्या तालावर कावड यात्रा आयोजकांसह सहभागी नाचत होते. मात्र, उभ्या करण्यात आलेल्या कावडकडे कोणाचेही लक्ष नसताना खेळत असलेल्या अधिराज पाटील याच्या डोक्यावर ही कावड कोसळली. यात गंभीर जखमी झालेल्या अधिराजला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अधिराजचे मामा सुधीर क्षीरसागर यांनी पुलगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी कावड यात्रा समितीचे आयोजक मंडले व आयोजन समितीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी