भांडुपमध्ये दहाव्या मजल्यावरून पडून महिला झाडाच्या फांद्यांमध्ये अडकली; अग्निशमन दलाने वाचवला जीव
मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबईतील भांडुप परिसरात एक जीवघेणी दुर्घटना घडली असून, सुदैवाने एका महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे. भांडुप येथील सनशाईन एसआरए इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून ही महिला अचानक खाली पडली. मात्र, इमारतीखाली असलेल्या मोठ्या झाडाच
Woman Survives Fall Tenth Floor Bhandup Mumbai


मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबईतील भांडुप परिसरात एक जीवघेणी दुर्घटना घडली असून, सुदैवाने एका महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे. भांडुप येथील सनशाईन एसआरए इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून ही महिला अचानक खाली पडली. मात्र, इमारतीखाली असलेल्या मोठ्या झाडाच्या फांद्यांमध्ये ती अडकून राहिल्याने थेट जमिनीवर आदळण्यापासून तिचा बचाव झाला. त्यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय या घटनेत पुन्हा एकदा आला.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या महिलेला बाहेर काढण्यासाठी जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अखेर प्रयत्नांनंतर महिलेला झाडावरून सुखरूप खाली उतरवण्यात आले. या घटनेत महिला थेट जमिनीवर कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, झाडाच्या फांद्यांमुळे तिचा जीव वाचला.

या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांमध्येही मोठी चर्चा सुरू झाली. महिलेचे नशीब बलवत्तर असल्यानेच तिचा जीव वाचल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. काही नागरिकांनी देवाचे आभार मानत सुटकेचा निश्वास सोडला. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या महानगरात उंच इमारतींमधून पडण्याच्या दुर्घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अनेक घटनांमध्ये दुर्दैवाने संबंधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भांडुपमधील ही घटना अत्यंत थरारक आणि तितकीच दिलासादायक ठरली आहे.

साधारण वर्षभरापूर्वी अहमदाबाद विमान दुर्घटनेतही एका प्रवाशाचा चमत्कारिकरीत्या जीव वाचला होता. त्यावेळीही ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण चर्चेत आली होती. भांडुपमधील या घटनेतही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. योग्य वेळी मिळालेली मदत आणि झाडाच्या फांद्यांमुळे महिलेचा जीव वाचल्याने परिसरात या घटनेची जोरदार चर्चा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande