
राजे संभाजी मित्र मंडळाचा उपक्रम
परभणी, 26 ऑगस्ट (हिं.स.)।
राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी बहुचर्चित ‘माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धा’ यंदा रविवारी(दि. ६ सप्टेंबर)सायंकाळी ७ वाजता उत्साहात होणार आहे. खासदार संजय जाधव यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील गोविंदा पथकांसह दहीहंडीप्रेमी नागरिकांमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.गोविंदा पथकांना दहीहंडी फोडण्यासाठी आवश्यक सराव मिळावा, त्यांच्यातील कौशल्याला व्यासपीठ मिळावे तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाला अधिक जल्लोषाचे स्वरूप प्राप्त व्हावे, या उद्देशाने राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यंदाही स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध गोविंदा पथके आपल्या कौशल्याची आणि संघभावनेची कसोटी लावणार आहेत.माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोविंदा पथकांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पथकाला १ लाख ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या पथकाला १ लाख रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या पथकाला ७५ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. दहीहंडी फोडताना गोविंदांच्या थरावर थर रचण्याचे कौशल्य, वेळेचे अचूक नियोजन, संघातील समन्वय आणि हंडी फोडण्यासाठी पथकांकडून करण्यात येणारे प्रयत्न हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. गोविंदा पथकांच्या थरारक कामगिरीमुळे उपस्थित प्रेक्षकांना रोमांचक क्षण अनुभवता येणार आहेत. त्याच बरोबर दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेचे आकर्षण वाढविण्यासाठी प्रसिध्द सिनेकलावंताची हजेरी राहणार आहे. या माखनचोर दहीहंडी स्पर्धेला परभणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन मुख्य आयोजक खासदार संजय जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis