
महामंडळास एकूण ८१ कोटी ३७ लाख ७१ हजार रुपयांचा तोटा
नाशिक, 26 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (सिटीलिंक) च्या संचालक मंडळाची ३५ वी बैठक काल नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील मीटिंग हॉल येथे पार पडली. नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
बैठकीच्या प्रारंभी उपस्थित सर्व संचालकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संचालक मंडळाच्या मागील ३४ व्या बैठकीतील विषय व निर्णयांचा संक्षिप्त आढावा घेण्यात आला. यावेळी एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय नियंत्रकांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. बैठकीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नाशिक विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांची नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालकपदी नियुक्ती करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली. त्याचप्रमाणे सन २०२५-२६ च्या आर्थिक विवरणपत्रास मंजुरी देण्यात आली.
यानंतर दि. ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे ताळेबंद व नफा-तोटा पत्रक तसेच संबंधित आर्थिक विवरणपत्रांचा मसुदा संचालक मंडळाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला. या आर्थिक विवरणपत्रावर संचालक मंडळाने सविस्तर चर्चा केली. सन २०२५-२६ मध्ये महामंडळाचे एकूण उत्पन्न रु. ९४ कोटी ६० लाख ८७ हजार असल्याची माहिती संचालक मंडळास सादर करण्यात आली. तसेच महामंडळाचा एकूण खर्च रु. १७५ कोटी २१ लाख ३४ हजार असून, महामंडळास रु. ८१ कोटी ३७ लाख ७१ हजार इतका एकूण तोटा झाल्याचे निदर्शनास आले. चर्चेनंतर सन २०२५-२६ च्या आर्थिक विवरणपत्रास संचालक मंडळाने मंजुरी दिली असून आवश्यक वैधानिक व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या ई-बसेसच्या संचालनाचे नियोजन, त्यांचा प्रवासी सेवेसाठी अधिकाधिक प्रभावी वापर, प्रवाशांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा विस्तार तसेच ई-बसेसच्या माध्यमातून सार्वजनिक परिवहन सेवा अधिक सक्षम करण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.
बैठकीस नाशिक महानगरपालिकेच्या उपमहापौर विलास शिंदे, सत्ताधारी पक्षाचे गटनेते अॅड. श्याम बडोदे, विरोधी पक्षाचे गटनेते केशव पोरजे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट, मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड, शहर अभियंता संजय अग्रवाल, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांच्यासह परिवहन महामंडळ लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे, बाजीराव माळी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेखा जाधव, महाव्यवस्थापक रघुनाथ कांबळे, महाव्यवस्थापक राहुल तोरो आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI