
परभणी, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासोबतच त्यांच्या सर्जनशील लेखनाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने संस्कृती वाचनकट्ट्याच्या वतीने आयोजित कथा लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विष्णू नगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या बालवाचकांनी स्वतः लिहिलेल्या कथा उपस्थितांसमोर सादर केल्या. आपल्या कल्पनाशक्तीला आणि विचारांना प्रभावी शब्दरूप देताना मुलांनी सादर केलेल्या कथांमधून त्यांची कल्पकता, संवेदनशीलता आणि प्रभावी अभिव्यक्ती दिसून आली. बालवाचकांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. स्पर्धेतील तसेच वाचन क्षेत्रातील उल्लेखनीय सहभागाबद्दल ‘उत्कृष्ट बालवाचक’ म्हणून गौरविण्यात आलेल्या मुलांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
वाचनासोबतच कथालेखनाच्या माध्यमातून स्वतःची अभिव्यक्ती प्रभावीपणे मांडणार्या बालवाचकांसाठी हा गौरव प्रेरणादायी ठरला. या उपक्रमामुळे मुलांना वाचनाबरोबरच लेखनाची आवड जोपासण्याची आणि आपल्या कल्पनांना शब्दबद्ध करण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालसाहित्यिक मारुती डोईफोडे होते. प्रमुख वक्त्या म्हणून बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळा, परभणीच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिंधू शर्मा, तर प्रमुख अतिथी म्हणून बाल विद्या मंदिर हायस्कूल, परभणीच्या शिक्षिका प्रा. रेश्मा देशमुख उपस्थित होत्या. मान्यवरांनी बालवाचकांचे कौतुक करून वाचन आणि लेखनाच्या माध्यमातून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मिळणार्या चालनेचे महत्त्व अधोरेखित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis