
मालेगाव, 26 ऑगस्ट (हिं.स.) : मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर दालनात टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात आल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याच्या वतीने अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. संबंधित फोटो तातडीने हटवावा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली.
महानगरपालिकेच्या उपमहापौर दालनात यापूर्वी टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावेळी भाजप तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केल्यानंतर संबंधित फोटो काढण्यात आला होता. दालनाचे काम सुरू असल्यामुळे फोटो काढण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यावेळी उपमहापौरांकडून देण्यात आले होते.
मात्र, दालनाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याने या प्रकरणाला पुन्हा वादाचे स्वरूप आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निषेधाचे निवेदन सादर केले.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात टिपू सुलतानचा उदो उदो चालणार नाही,” असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी दिला.
निवेदनात, महापुरुषांच्या शासकीय यादीत टिपू सुलतान यांचा समावेश नसताना मालेगाव शहरातील सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याच्या उद्देशाने तसेच राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वादग्रस्त कृती केल्या जात असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावणे हा त्याचाच एक भाग असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या प्रकरणामुळे भविष्यात सामाजिक तेढ अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उपमहापौरांची राहील, असा इशाराही भाजपने दिला. संबंधित फोटो तातडीने हटवण्यात न आल्यास भाजप तसेच मालेगाव शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, दादा जाधव, शहराध्यक्ष देवा पाटील, सरचिटणीस कमलेश निकम, लकी गिल, नंदू तात्या सोयगावकर, संदीप भुसे, अॅड. चंद्रशेखर शेवाळे, अॅड. हर्षल पवार, धनंजय पवार, आप्पा कुलथे, प्रतीक्षा भोसले, मंगला तलवारे, मालती गवांदे, नाना मराठे आदी उपस्थित होते.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI