
रायगड, 28 ऑगस्ट (हिं.स.)। पोलादपूर तालुक्यातील कणगुले येथे घराच्या किचनच्या खिडकीची ग्रील उचकटून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कणगुले येथे ही घरफोडी झाल्याचे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. फिर्यादी महिलेच्या राहत्या घरातील किचन रूमच्या स्लायडिंग खिडकीची ग्रील उचकटून तसेच काच सरकवून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाटाचा ताबा घेत त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. घरातील व्यक्तींच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने ही चोरी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात प्रवेश करण्यासाठी चोरट्याने खिडकीचा वापर केल्याने परिसरातील घरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून चोरीस गेलेल्या ऐवजाचा आणि अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार जागडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)