
रत्नागिरी, 28 ऑगस्ट (हिं.स.) । सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकूण २४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत कारवांचीवाडी फाटा ते खेडशी मार्गावर वाहन वाहतुकीला अडथळा ठरेल अशा स्थितीत उभे केल्याप्रकरणी विजय यशवंत पवार (वय ४७, रा. कोकजेवठार) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच मार्गावर रिक्षा धोकादायक स्थितीत उभी केल्याप्रकरणी विजय यशवंत रेवाळे (वय ४२, रा. भोके) याच्यावर, तर सचिन प्रदीप साळुंखे (वय ४६, रा. खेडशी) आणि रंजित रघुनाथ लवंदे (वय ४२, रा. आगरनरळ भोईवाडी) यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले.
लांजा तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरील एसटी स्टँडजवळ मोटारसायकल वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने उभी केल्याप्रकरणी गौरव हेमंत आग्रे (वय २४, रा. रावरी, ता. लांजा) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्याच परिसरात क्वालीस वाहन उभे केल्याप्रकरणी कल्पेश अरुण राणे (वय ३६, व्यवसाय चालक, रा. बोरथडे मधलीवाडी, लांजा) याच्यावर कारवाई करण्यात आली. फैजान टायर सर्व्हिससमोर ज्युपिटर मोटारसायकल उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अल्ताफ मुराद ठाकूर (वय ४२, रा. अंजणारी मुस्लिमवाडी, लांजा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जावडे फाटा, आग्रे हॉलजवळ वॅगनआर उभी केल्याप्रकरणी निखिल अनंत लिंगायत (वय ३०, रा. वाडीलिंबू, मोहितेवाडी, लांजा) याच्यावर, तर सोनाई हॉस्पिटलसमोर ग्लॅमर मोटारसायकल उभी केल्याप्रकरणी योगेश किशोर पांचाळ (वय ४३, रा. सुतारवाडी, लांजा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
खेड पालिकेसमोर खेड-दापोली मार्गावर दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी क्षितिज संजय दरेकर (वय ३०, रा. आठवडा बाजार, भरणे नाका, खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अलोरे-शिरगाव पोलिसांच्या हद्दीत पिंपळी बुद्रुक येथील निसर्ग हॉटेलसमोर गुहागर-विजापूर राज्य महामार्गावर अवजड वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सरदार लालू चव्हाण (वय ३४, रा. कोरवार, ता. सिंदगी, जि. विजापूर, कर्नाटक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याच ठिकाणी दुसरे अवजड वाहन उभे केल्याप्रकरणी अमेश लक्ष्मण राठोड (वय २५, रा. जळगीर, विजापूर, कर्नाटक) याच्यावरही कारवाई करण्यात आली.
चिपळूणमध्ये बहादूरशेख नाका येथील साई प्लाझासमोर चिपळूण-कराड मार्गावर टाटा मॅजिक वाहन वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभे केल्याप्रकरणी संतोष परशुराम शिंदे (वय ४८, रा. कोळकेवाडी पायरवाडी, ता. चिपळूण) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संगमेश्वर बाजारपेठेत राज ट्रेडर्ससमोर सार्वजनिक रस्त्यावर टाटा जीप टेम्पो धोकादायक स्थितीत उभा केल्याप्रकरणी नीलेश नामदेव चव्हाण (वय ४०, रा. कोळंबे चव्हाणवाडी, ता. संगमेश्वर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संगमेश्वर-देवरूख मार्गावर बोलेरो पिकअप उभी केल्याप्रकरणी अय्य सरदार कतनळी (वय ५०, रा. संगमेश्वर) याच्यावर, तर मोटार उभी केल्याप्रकरणी दिनेश मधुकर कांचले (वय ३४, रा. शाहुवाडी, मलकापूर, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
रत्नागिरी शहरात तेलीआळी नाका, आठवडा बाजार, जेलनाका ते भगवती मंदिर मार्ग, तसेच जयस्तंभ व नगर वाचनालय परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये अरविंद केशव शिंदे (वय ४२, रा. खालीची आळी, रत्नागिरी), आदिल इकबाल बहुये (वय ४७, रा. उद्यमनगर, रत्नागिरी), अक्षय मोहन राऊत (वय ३२, रा. गोडबोले स्टॉप, रत्नागिरी) आणि रविकांत देवानंद कडपट्टे (वय ३३) यांचा समावेश आहे.
रत्नागिरी-हातखंबा मार्गावरील मारुती मंदिर परिसरात वाहन वाहतुकीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने उभे केल्याप्रकरणी सागर सुभाष बंदरकर (वय ४८, रा. निवखोल पुलाजवळ, रत्नागिरी) याच्यावर कारवाई करण्यात आली. जयगड रोडवरील खंडाळा येथील श्रेया हॉटेलसमोर सार्वजनिक रस्त्यावर बोलेरो वाहन धोकादायक स्थितीत सोडल्याप्रकरणी मानाजी सदाशिव चव्हाण (वय ५३, रा. सदाशिवनगर, मशिदीजवळ, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात जयगड सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
राजापूरमध्ये सोल्ये ते राजापूर रेल्वे स्थानक परिसरातील नो-पार्किंग झोनमध्ये इको वाहन उभे करून वाहतुकीस व नागरिकांच्या सुरक्षिततेस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी इस्माईल जाफर नाईक (वय ६५, रा. हसोळ मुस्लिमवाडी, राजापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सार्वजनिक रस्ते वाहतुकीसाठी असताना रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केल्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत जिल्ह्यातील विविध भागांत २४ गुन्हे दाखल झाल्याने सार्वजनिक रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी