
गोल्ड लोन घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून भंडाफोड; मुख्य सूत्रधारासह ८ जण अटकेत
नागपूर, 28 ऑगस्ट (हिं.स.) : आयसीआयसीआय बँकेच्या गोल्ड लोन प्रक्रियेत बनावट कागदपत्रे आणि खोटे कर्जदार उभे करून तब्बल २३ कोटी ३१ लाख ८४ हजार ७५२ रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार नागपूर शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असून, बँकिंग क्षेत्रात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ३० मार्च २०२६ रोजी नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला बँकेचे सुमारे २३ कोटी १९ लाख ४१ हजार ७५१ रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. मात्र, सखोल तपासानंतर फसवणुकीची रक्कम २३ कोटी ३१ लाख ८४ हजार ७५२ रुपये असल्याचे निष्पन्न झाले.तपासात हा गैरव्यवहार मनीष नगर, मेडिकल चौक, नरसाळा, काटोल रोड, अजनी चौक, छत्रपती चौक, वर्धा रोड, प्रतापनगर आणि नंदनवन यांसह विविध शाखांमध्ये पसरल्याचे समोर आले आहे.बँकेच्या नियमित आकडेवारीच्या तपासणीदरम्यान आणि नियतकालिक ऑडिटच्या वेळी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी एका गोल्ड लोन खात्यातील तारण दागिन्यांबाबत संशयास्पद बाब आढळून आली. त्यानंतर बँकेने एकापाठोपाठ एक अशा १५२ संशयास्पद गोल्ड लोन खात्यांची तपासणी सुरू केली. या तपासातून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले.
पोलिसांच्या तपासानुसार सचिन राऊत हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या राऊतने २०१८-१९ मध्ये स्वतःच्या नावावर गोल्ड लोन घेत बँकेत आपली पत निर्माण केली. त्यानंतर बँक व्यवस्थापकांची गोल्ड लोनची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या मजुरांच्या नावावर कथितरीत्या बोगस कर्जे काढल्याचा आरोप आहे.
या गैरव्यवहारात बँक मॅनेजर पंकज केकतपुरे, दिनेश नागपुरे, आशिष वंजारी तसेच उपव्यवस्थापक प्रकाश अवस्थी यांनी विविध शाखांमधून मुख्य आरोपीला सक्रिय मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणात अप्रेझर/व्हॅल्युअर नदू खरवडे याची चार शाखांमध्ये नियुक्ती नसतानाही त्याला इतर शाखांमध्ये पाठवून १५५ बनावट सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन करून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. प्रत्येक मूल्यांकन अहवालामागे बँक मॅनेजर पंकज केकतपुरे हा खरवडे याला ५ हजार रुपये देत असल्याचा आरोप आहे.याशिवाय खरवडे याने आपल्या परिचयातील नातेवाईक आणि मित्रांच्या माध्यमातून ३८ बनावट ग्राहक बँकेसमोर उभे करून दिल्याचेही तपासात उघड झाले आहे.
ऑडिटर्सनाही हाताशी धरल्याचा आरोप
बँकेचे ऑडिट तीन महिन्यांनी होत असल्याचा गैरफायदा घेत प्रमोद टेटे, राजेंद्र शिलनकर आणि धनंजय ढोमने या तीन ऑडिटर्सना हाताशी धरल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. बनावट सोन्याचे दागिने शुद्ध सोन्याचे असल्याचे दर्शविणारे खोटे अहवाल तयार करण्यासाठी त्यांनाही कथितरीत्या लाच देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करताना मनी ट्रेल, मोबाईल सीडीआर आणि आरोपींच्या घरांची झडती यावर विशेष भर दिला. या कारवाईत मोबाईल फोन, लॅपटॉप, बोगस कर्जदारांच्या याद्या तसेच महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.बँकेचे अधिकारी, व्हॅल्युअर, ऑडिटर आणि कथित कर्जदारांची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा दायरा वाढवला. आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असून, या कथित रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी