
अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.)।
रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांना, अंगरक्षकांना तसेच महाराष्ट्र पोलीस विभागातील जवानांना राख्या बांधून व औक्षण करून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या रक्षणकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा भावनिक उपक्रम राबविण्यात आला.रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून, परस्पर रक्षण, विश्वास आणि आपुलकीची भावना दृढ करणारा पवित्र सण असल्याचे नवनीत राणा यांनी यावेळी सांगितले. जवानांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि समर्पणाचे कौतुक केले.“देशाच्या सुरक्षेसाठी जवान दिवस-रात्र तत्पर असतात. ऊन, वारा, पाऊस किंवा कोणतीही परिस्थिती असो, ते आपल्या कर्तव्यापासून कधीही मागे हटत नाहीत. माझ्या सुरक्षेसाठी तसेच देश आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या प्रत्येक जवानाच्या समर्पणाला मी मनापासून सलाम करते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.सुरक्षा व्यवस्था सांभाळताना अनेक जवानांना सण-उत्सवाच्या काळातही कुटुंबीयांपासून दूर राहून कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे त्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या सेवेला सन्मान देण्याचा हा उपक्रम विशेष ठरला.यावेळी नवनीत राणा यांनी महिला सक्षमीकरणासाठी राज्य आणि केंद्र सरकार सातत्याने पुढाकार घेत असल्याचेही नमूद केले. “रक्षण करणाऱ्या हातांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हीच खरी रक्षाबंधनाची भावना आहे,” असे त्या म्हणाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी