
मुंबई, 28 ऑगस्ट, (हिं.स.)। प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अरमान मलिक याचा भाऊ, अमाल मलिक याने चित्रपट संगीतातून एक वर्षाचा ब्रेक घेण्याची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' (Aawarapan 2) या चित्रपटासाठी नुकतेच 'ये आवारापन' (Yeh Aawarapan) हे गाणे संगीतबद्ध करणाऱ्या अमालने सोशल मीडियाद्वारे हा निर्णय जाहीर केला. आपण ठीक आहोत आणि सध्याच्या काळात आपल्या मानसिक, शारीरिक व भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करू इच्छितो, असे त्याने स्पष्ट केले. तसेच, एका वर्षानंतर नव्या ऊर्जेसह संगीत विश्वात परतण्याचे आश्वासनही त्याने चाहत्यांना दिले.
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अमालने लिहिले की, यावेळी त्याला स्वतःसाठी जे सर्वोत्तम आहे ते करायचे आहे. त्याने नमूद केले की, त्याला त्याचे मन, शरीर आणि आत्मा, तसेच शारीरिक आरोग्यासाठी विश्रांतीची गरज आहे. चाहत्यांशी संवाद साधताना त्याने स्वतःला ताजेतवाने करून पूर्ण उत्साहाने परतण्याच्या गरजेचा उल्लेख केला. अमालने हे देखील स्पष्ट केले की, आगामी वर्षात त्याचे कोणतेही नवीन चित्रपट संगीत प्रदर्शित होणार नाही; मात्र, यापूर्वी संगीतबद्ध केलेली आणि अद्याप प्रदर्शित न झालेली काही चित्रपट गाणी संबंधित चित्रपटांच्या प्रदर्शनासोबत येऊ शकतात.
या काळात आपल्याला त्रास देऊ नये, असे आवाहन अमालने चाहत्यांना केले आणि नवीन प्रकल्प किंवा संगीताबाबतची माहिती आपण स्वतःच शेअर करू, असेही सांगितले. आपल्या प्रवासाचा आढावा घेताना त्याने नमूद केले की, संगीत ते चित्रपट असा त्याचा प्रवास खूप मोठा राहिला आहे आणि आता त्याला काही काळासाठी पुन्हा संगीताकडे वळायचे आहे. या निर्णयामुळे, अमाल लवकर बरा व्हावा आणि नव्या उत्साहाने पुनरागमन करावे, अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर