
नाशिक, २९ ऑगस्ट (हिं.स.) : नाशिक रोडजवळील चाडेगाव शिवारात बिबट्याने पाळीव कुत्र्याचा केलेला थरारक पाठलाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जीव वाचविण्यासाठी कुत्र्याने अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या बंगल्याच्या थेट तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, या उडीमुळे त्याच्या पायाला दुखापत झाल्याने धावण्याची क्षमता कमी झाली. अखेर बिबट्याने त्याला गाठून शिकार केली. पहाटेच्या अंधारात घडलेल्या या घटनेमुळे चाडेगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिन्नर फाट्याजवळील चाडेगाव शिवारात शेतकरी शिवाजी देवराम वाघ यांचा बंगला आहे. त्यांच्या राहत्या बंगल्यासमोरच अर्धवट बांधकाम सुरू असलेला तीन मजली बंगला आहे. गुरुवारी रात्री वाघ यांच्या पाळीव कुत्र्याला बिबट्याचे दर्शन झाले. घाबरलेल्या कुत्र्याने जीव वाचविण्यासाठी समोरील अर्धवट बांधकाम असलेल्या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन आश्रय घेतला.
दरम्यान, कुत्र्याच्या वासाचा माग काढत शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास बिबट्या पुन्हा या परिसरात आला. कुत्रा तिसऱ्या मजल्यावर असल्याचे लक्षात येताच बिबट्याने थेट बंगल्याच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. एकामागू0न एक पायऱ्या चढत तो थेट तिसऱ्या मजल्यावर पोहोचला.
बिबट्या आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून घाबरलेल्या कुत्र्याने जीवाच्या आकांताने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. उडी मारल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली आणि काही क्षण तो असहाय्य झाला. मात्र, बिबट्याने पाठलाग सोडला नाही. तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर बिबट्या पुन्हा त्याच पायऱ्यांनी खाली उतरला आणि जखमी कुत्र्याच्या दिशेने सरकला.
बिबट्या जवळ येताच कुत्र्याने पुन्हा जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, जखमी अवस्थेत त्याला फार दूर जाता आले नाही. अखेर बिबट्याने त्याला गाठून त्याची शिकार केली.
सकाळी पाळीव कुत्रा परिसरात दिसत नसल्याने वाघ कुटुंबीयांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी रात्रीपासून पहाटेपर्यंत बिबट्याने कुत्र्याचा केलेला पाठलाग, पायऱ्यांवरून तिसऱ्या मजल्यावर चढलेला बिबट्या, कुत्र्याने तिसऱ्या मजल्यावरून घेतलेली जीवघेणी उडी आणि त्यानंतर बिबट्याने पुन्हा पायऱ्यांनी खाली उतरत केलेला पाठलाग, हा संपूर्ण थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले.
या घटनेमुळे चाडेगाव शिवारातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा असून, वन विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI