
कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे यांनी संतपरंपरा, नाथ संप्रदाय आणि सदाचाराचे विचार उलगडले
नाशिक, 29 ऑगस्ट (हिं.स.) : संतवाङ्मयाचे वैभव, नाथ संप्रदायाच्या रचनांमधील आध्यात्मिक आशय तसेच संतपरंपरेतील समता, मानवता आणि सदाचाराचे विचार प्रभावीपणे उलगडत कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे यांनी रसिकांना भक्तिरसाचा अनुभव दिला. ‘हे आदिमा हे अंतिमा’, ‘वंदू चरणी घालू लोटांगण’, ‘रघुपती राघव राजाराम’ आणि ‘रामा हो जयरामा’ या रचना व भजनांच्या सादरीकरणाने ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’चा परिसर भक्तिमय झाला.
सिंहस्थ महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ या भक्ती-सांस्कृतिक सोहळ्यात डॉ. आफळे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत संतपरंपरा, नाथ संप्रदाय, संतवाङ्मय, अध्यात्म आणि नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेचे विविध पैलू उलगडले.
नाथ संप्रदायाच्या रचनांमधील आध्यात्मिक आशय, आत्मचिंतन आणि जीवनमूल्यांचे महत्त्व त्यांनी विविध दाखल्यांसह स्पष्ट केले. ‘हे आदिमा हे अंतिमा’ या रचनेच्या भावपूर्ण सादरीकरणातून त्यांनी भक्ती आणि अध्यात्माचा भाव रसिकांपर्यंत पोहोचविला. ‘वंदू चरणी घालू लोटांगण’ या रचनेतून ईश्वरचरणी समर्पणाची भावना व्यक्त झाली. तर ‘रघुपती राघव राजाराम’ आणि ‘रामा हो जयरामा’ या भजनांनी श्रीरामभक्तीचा जागर केला.
‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’च्या माध्यमातून देशभरातील विविध भक्तीपरंपरा आणि सांस्कृतिक प्रवाहांना एकाच व्यासपीठावर आणण्यात आले आहे. अभंग, भक्तिगीते आणि विविध रचनांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळ भक्तिभावाने भारावून गेले.
नाशिकच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महतीचा संदर्भ देताना डॉ. आफळे यांनी गोदावरीचा तीर, संतपरंपरा आणि सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकला लाभलेले वैशिष्ट्यपूर्ण स्थान विशद केले. विविध भक्तीसंप्रदाय, संतवाङ्मय, साहित्य, कला आणि संस्कृती यांचा संगम घडविणारी भूमी म्हणून नाशिकचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
गोदावरीच्या तीरावर शतकानुशतके जोपासली गेलेली भक्तीपरंपरा आणि सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे देशभराशी जोडले गेलेले नाशिकचे सांस्कृतिक नाते यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
संत एकनाथ महाराजांच्या विचारांचे विवेचन करताना डॉ. आफळे यांनी त्यांच्या साहित्यामधील समता, मानवता, करुणा, बंधुभाव आणि लोककल्याणाची भावना अधोरेखित केली. अभंग आणि भारुडाच्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांनी समाजातील विसंगतींवर भाष्य करत प्रबोधन केले, असे त्यांनी सांगितले.समर्थ रामदास स्वामींच्या विचारांवर भाष्य करताना त्यांनी प्रपंच आणि परमार्थाचा समतोल, कर्तव्यनिष्ठा, आत्मशक्ती, विवेक, सदाचार आणि समाजहित यांचे महत्त्व स्पष्ट केले.------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI