
संतविचार आचरणात आणण्याचे आवाहन
नाशिक, २९ ऑगस्ट (हिं.स.) : समाजातील सर्व प्रकारचे भेद विसरून मानवतेच्या कार्यासाठी स्वतःला समर्पित करणे हीच ईश्वराची खरी आराधना आहे, असा सूर सिंहस्थ महाकुंभ भक्तीसंगम चर्चासत्रात उमटला. भारतीय संत परंपरेने दिलेला सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुभावाचा संदेश आजच्या समाजाने आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सत्राध्यक्ष स्वामी वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी यांनी केले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने ठक्कर डोम येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्यानिमित्त ‘भारतीय संत आणि समरसता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पराग महाराज चातुर्मासे यांनी सत्र समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली.
चर्चासत्रात शिवाजी महाराज मोरे, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप यांनी सहभाग घेत विविध विषयांवर विचार मांडले. भारतीय संत परंपरेने समाजातील विविध भेद दूर करून ‘आपण सर्वजण एक आहोत’, असा समता आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला आहे. संतांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात बंधुभाव, एकात्मता आणि समतेची भावना अधिक दृढ करण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
भारतीय संतांनी अभंग, कीर्तन आणि आध्यात्मिक शिकवणीतून सामाजिक एकात्मतेचा विचार समाजासमोर मांडला. समाजातील भेदभाव दूर करून सर्व घटकांना समानतेची वागणूक देणे आणि परस्परांमध्ये बंधुभाव निर्माण करणे, हाच सामाजिक समरसतेचा मूलभूत उद्देश असल्याचे चर्चासत्रात नमूद करण्यात आले.
कुंभमेळा हा विविध संप्रदाय, परंपरा आणि विचारधारांना एका व्यासपीठावर आणणारा आध्यात्मिक व सांस्कृतिक सोहळा आहे. या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि समरसतेचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविता येतो. त्यामुळे दैनंदिन जीवनातही संतविचार आचरणात आणून समाजातील भेदभाव दूर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील विश्वकल्याणाची भावना आणि सर्वांच्या सुखाची प्रार्थना ही सामाजिक समरसतेची प्रेरणा देणारी असल्याचेही वक्त्यांनी स्पष्ट केले. समाजातील भेदभाव हे अनेकदा दुःखाचे कारण ठरतात. त्यामुळे संतांच्या समता आणि बंधुभावाच्या विचारांतून प्रेरणा घेऊन सामाजिक सलोखा व एकात्मता अधिक मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
चर्चासत्रात विविध वक्त्यांनी सामाजिक समरसतेच्या अनुषंगाने आपले विचार प्रभावीपणे मांडले. समारोपप्रसंगी माधवदास महाराज राठी यांनी समारोपीय मनोगत व्यक्त केले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI