६७ वर्षांनंतरही संस्कृतीची नाळ कायम; ‘श्रावणसरी’त महिलांचा जल्लोष
रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। रायगड : कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघाच्या वतीने समाजातील महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेला ‘श्रावणसरी’ हा सांस्कृतिक सोहळा उत्साहात पार पडला. संघाचे अध्यक्ष अरुण साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्र
Cultural bond remains strong even after 67 years; women celebrate with enthusiasm at ‘Shravansari’


रायगड, 29 ऑगस्ट (हिं.स.)। रायगड : कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघाच्या वतीने समाजातील महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेला ‘श्रावणसरी’ हा सांस्कृतिक सोहळा उत्साहात पार पडला. संघाचे अध्यक्ष अरुण साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला रायगड, ठाणे, पालघर आणि सातारा जिल्ह्यांतील कोयना प्रकल्पग्रस्त महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमातून महिलांनी पारंपरिक गीते, नृत्य, वादन आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणातून आपल्या कला, संस्कृती व परंपरांचे दर्शन घडविले. कोयना प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर होऊन ६७ वर्षे झाली असली, तरी आपल्या सांस्कृतिक मुळांशी असलेली नाळ आजही कायम असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. ‘श्रावणसरी’च्या माध्यमातून महिलांना कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळण्याबरोबरच समाजातील स्नेह, एकोपा आणि आपलेपणा दृढ करण्याची संधी मिळाली.

स्पर्धेत जय भवानी महिला मंडळ, करंजावडे-धरणाकॅम्प (रायगड) यांनी प्रथम, केदारनाथ महाकाली महिला मंडळ, कोयना वेळे (रायगड) यांनी द्वितीय, तर रोहिणे महिला मंडळ, रोहिणे-आनंगाव (ठाणे) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. जिजामाता महिला मंडळ, रानसई-उचाट आणि जय भवानी महिला मंडळ, कोयना-जांब्रुक यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

आसावरी अरुणराव साळुंखे यांना सर्वोत्कृष्ट नृत्यांगना, नम्रता अनिकेत कदम यांना उत्कृष्ट गायन, तर शौर्य पवनराव कदम यांना उत्कृष्ट वादनाचे पारितोषिक मिळाले. पारंपरिक पद्धतीने गाणी सादर केल्याबद्दल राणी लक्ष्मीबाई महिला मंडळ, उचाट-वाडा यांचा विशेष गौरव करण्यात आला. ‘नशिब पैठणीचे’ उपक्रमातील दहा विजेत्यांनाही पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देतानाच सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपणारा ‘श्रावणसरी’चा सोहळा संस्मरणीय ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande