कोल्हापूरच्या दसरा चौकात रंगणार युवाशक्ती दहीहंडीचा थरार
कोल्हापूर, २९ ऑगस्ट (हिं.स.) : कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्या वतीने यंदाही भव्य युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार असून,
पत्रकार परिषदेत राज्यसभा खा. धनंजय महाडिक


कोल्हापूर, २९ ऑगस्ट (हिं.स.) : कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्या वतीने यंदाही भव्य युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार असून, पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रिय दहीहंडी स्पर्धेतील विजेतेपदासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. विजेत्या पथकाला यंदा ३ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. पहिल्याच प्रयत्नात पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकाला ५ हजार रुपये, सहा थरांसाठी १० हजार रुपये, तर सात थरांसाठी १५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. आठ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल १ लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.

दहीहंडी सोहळ्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीने सर्व गोविंदा पथकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी यंदाही विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.

समीट ऍडव्हेंचरचे विनोद काम्बोज आणि हिल रायडर ऍडव्हेंचर फाउंडेशनचे प्रमोद पाटील यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभणार आहे.

गोविंदा जखमी झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी समीट ऍडव्हेंचर, हिल रायडर ऍडव्हेंचर तसेच व्हाईट आर्मीचे कार्यकर्ते सज्ज राहणार आहेत. सीपीआर आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात येणार आहे. दहीहंडी फोडणारा सर्वात वरच्या थरावरील गोविंदा १४ वर्षांवरील असावा, या नियमाचे काटेकोर पालन केले जाणार असून, सर्व गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंतचे अपघाती विमा कवच देण्यात येणार आहे.

छायाचित्रण आणि रिल्स स्पर्धाही

युवाशक्ती दहीहंडीच्या निमित्ताने छायाचित्रण स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट छायाचित्रांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार आणि ३ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच युवाशक्ती दहीहंडी रिल्स स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून, सर्वोत्तम रिल्स बनविणाऱ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वराज्य ढोलताशा पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. शासनाने दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिल्याने, त्यानुसार सर्व नियमांचे पालन करून स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेदरम्यान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंचा सत्कारही करण्यात येणार आहे.

दसरा चौकात भव्य नियोजन

युवाशक्ती दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक दसरा चौक मैदानात शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. डीजे रणजित यांच्यासह उत्तम ध्वनी व प्रकाश व्यवस्था, मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ तसेच महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचे चॅनल बीवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

युवाशक्ती दहीहंडीच्या तयारीसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी आढावा बैठक घेतली असून, भाजप आणि युवाशक्तीचे सुमारे २५० कार्यकर्ते सोहळा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

कोल्हापूरवासीयांनी दहीहंडीचा थरार आणि आनंद अनुभवण्यासाठी शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दसरा चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, नगरसेवक वैभव कुंभार, प्रमोद पाटील, विनोद काम्बोज, सागर बगाडे, उत्तम पाटील, विजय टिपुगडे, राजेंद्र बनसोडे, झाकीर जमादार, उदय चव्हाण, उमेश पाटील, अमित पालोजी आणि विनायक सुतार उपस्थित होते.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande