पेण तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान
पेण, २९ ऑगस्ट (हिं.स.) : महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिब
Services ranging from 7/12 extracts to various certificates available right in the village; special revenue camps in Pen.


पेण, २९ ऑगस्ट (हिं.स.) : महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पेण तालुक्यात पुढील तीन महिन्यांत तालुका व मंडळ स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अभियानांतर्गत ७ मार्च, १४ मार्च, १० व १७ एप्रिल तसेच ८ मे आणि १५ मे असे सहा विशेष दिवस निश्चित करण्यात आले आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील मंडळ, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात ही शिबिरे घेण्यात येणार असून, प्रलंबित महसुली प्रकरणे, विविध दाखले तसेच नागरिकांच्या अर्जांवर थेट कार्यवाही केली जाणार आहे.

या शिबिरांमध्ये फेरफार नोंदी निकाली काढणे, ७/१२ उताऱ्यातील चुका दुरुस्त करणे, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उतारे उपलब्ध करून देणे, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे तसेच नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसह विविध महसुली सेवा दिल्या जाणार आहेत.

याशिवाय तुकडेबंदी कायदा, पाणंद रस्ते, घरपट्टे, ऍग्रीस्टॅक नोंदणी, पीएम किसान योजना आणि वारस तपास नोंदी यांसंबंधीच्या प्रकरणांवरही शिबिरांमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे.

भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून गावठाण भूमापन, स्वामित्व योजनेंतर्गत फेरफार, डिजिटल सेवांचा प्रसार तसेच महाभूमी पोर्टलबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचा वेळ व श्रम वाचविणे आणि प्रलंबित प्रकरणांना गती देणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी केले.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande