
नाशिक, २९ ऑगस्ट (हिं.स.) : चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचा ताबा सुटल्याने एकापाठोपाठ एक तब्बल ६ ते ७ वाहनांना भीषण धडक बसली. या विचित्र आणि भीषण अपघातात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, ८ ते १० जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरून एक ट्रक भरधाव वेगाने जात होता. अचानक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रकने पुढे धावणाऱ्या कार, इतर ट्रक तसेच लहान-मोठ्या वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण ६ ते ७ वाहने एकमेकांवर आदळली.
धडक इतकी भीषण होती की, काही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील प्रवासी वाहनांमध्ये अडकून पडले होते. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पथक, महामार्ग पोलीस तसेच स्थानिक टोलनाक्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आहे.
या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटविल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.
दरम्यान, ट्रक चालकाचा ताबा नेमका कोणत्या कारणामुळे सुटला, चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला की ट्रकमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता, याचा तपास चांदवड पोलीस करत आहेत.
या भीषण अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील रात्रीच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI