
नाशिक, २९ ऑगस्ट (हिं.स.) : कृतज्ञता ही केवळ शब्दांतून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त झाली पाहिजे. समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व जपण्यासाठी आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा आणि संपत्तीचा उपयोग वंचित व गरजू घटकांच्या कल्याणासाठी करणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षण, रक्तदान, स्वच्छता मोहीम तसेच गरिबांच्या शिक्षणासाठी योगदान देऊन आपण समाजाचे ऋण फेडू शकतो. समाजाने आपल्याला काय दिले, यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो, हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे. आपण जे कार्य करू, ते समाज आणि देशाच्या हिताचे असले पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते सुहास वैद्य यांनी केले.
जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड येथे शिबिर संयोजकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाशिक विभागातील अंबड, सातपूर, गोंदे, इगतपुरी, सिन्नर आणि दिंडोरी या औद्योगिक भागांत सातत्याने रक्तदान शिबिरे आयोजित करणाऱ्या तसेच अर्धशतकवीर आणि शतकवीर ठरलेल्या १३० रक्तदान शिबिर संयोजकांचा सत्कार करण्यात आला.
रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष विश्वनाथ जालनापुरकर, रा. स्व. संघ नाशिक शहर कार्यवाह सुहास वैद्य, जीएसटी व व्यवस्थापन सल्लागार रविंद्र देवधर, प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश जोशी आणि जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी यांच्या हस्ते या संयोजकांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. योगेश सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक व आभार शैलेश पंडित यांनी मानले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI