इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानचा १९४ धावांनी धुव्वा उडवत मालिकाही जिंकली
लंडन, 31 ऑगस्ट (हिं.स.) : दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने पाकिस्तानला १९४ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडने पाकिस्तानसमोर ३८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात पाक
इंग्लंडचा क्रिकेट संघ


लंडन, 31 ऑगस्ट (हिं.स.) : दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने पाकिस्तानला १९४ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडने पाकिस्तानसमोर ३८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात पाकिस्तानचा दुसरा डाव १९४ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे पाकिस्तानने लॉर्ड्स कसोटी आणि मालिका गमावली.

इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सन आणि जोश टंग यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. पाकिस्तानसाठी सौद शकीलने चौथ्या डावात ९७ धावा केल्या. पण त्याची झुंजार खेळी पाकिस्तानला पराभवापासून वाचवण्यासाठी पुरेसा ठरला नाही. सहा पाकिस्तानी फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले. ऑली रॉबिन्सनने दोन्ही डावांमध्ये मिळून एकूण आठ बळी घेतले.

तत्पूर्वी, इंग्लंडने चौथ्या दिवसाच्या खेळाला १७७/७ या धावसंख्येने सुरुवात केली आणि आपल्या धावसंख्येत ३१ धावांची भर घातली. पहिल्या डावात १८० धावांची आघाडी घेतल्यानंतर, इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात २०८ धावा करून पाकिस्तानसमोर ३८९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात, पाकिस्तानची सुरुवात खराब झाली आणि १४ धावांतच अझान ओवैस, अब्दुल्ला शफीक आणि बाबर आझम बाद झाले. सलामीवीर शान मसूद नंतर शकीलसोबत सामील झाला आणि त्या दोघांनी एक भक्कम भागीदारी रचून धावसंख्या १११ पर्यंत नेली. रॉबिन्सनने शान मसूदला बाद करून ही भागीदारी तोडली आणि पाकिस्तानचा डाव अडखळला.

शकीलने एक बाजू लावून धरली होती, पण दुसऱ्या बाजूने फलंदाज अपयशी ठरले. मोहम्मद रिझवान आणि अली उस्मान हे देखील लवकर बाद झाले आणि त्यानंतर टँगने पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का दिला. टँगने ९७ धावांवर शकीलला ब्रूककरवी झेलबाद केले. त्यानंतर पाकिस्तानचा संघ पूर्णपणे कोसळला आणि १९४ धावांत नऊ गडी गमावले. दुखापग्रस्त इमाम-उल-हक फलंदाजीला आला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande