
कोल्हापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)।
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना पावसाच्या सरी आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने, पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी, आणि बिगुलची धून वाजवून शासकीय इतमामात कसबा बावडा येथे हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. तीन फैरीने सलामी बिगुल वाजवून मानवंदना दिली. त्यानंतर पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवला भडाग्नी देण्यात आला.
सायंकाळी ४ वाजता पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांची अंत्ययात्रा त्यांच्या कसबा बावडा येथील 'यशवंत' या निवास स्थानातून निघाली फुलानी सजवलेल्या वहानात त्यांचे तिरंगा झेंड्यात पार्थिव ठेवण्यात आले होते. बावड्यातील प्रमुख मार्गवरून निघालेल्या अंत्य यात्रेत हजारो नागरीक सहभागी झाले झाले होते. रस्त्याच्या दुतर्फाही त्यांचे दर्शन घेणासाठी गर्दी झाली होती.
कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर खास तयार केलेल्या चबुतऱ्यावर त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, डॉ. विजय डी पाटील, डॉ.अजिंक्य डी पाटील, डॉ. श्री. उद्धव पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. पी. डी. पाटील यांच्यासह कौटुंबिक सदस्य उपस्थित होते.
या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खा. छ. शाहू महाराज, माजी मंत्री जयंत पाटील सुशीलकुमार शिंदे, यशोमती ठाकूर, संपादक प्रतापसिंह जाधव पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यानंतर शासकिय मानवंदना देण्यात आली.
राज्य शासनाचे आजी माजी मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी, समाजसेवक, डी वाय पाटील ग्रुपचे सर्व शिक्षक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी पुणे, मुंबईसह प. महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो जनतेच्या उपास्थितीत आनंद महाराज गोसावी, अभिनेते सयाजी शिंदे,आ. अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम, माजी खा. संभाजीराजे छत्रपती, माजी आ. मालोजीराजे छत्रपती, आदीनी पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले.
पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी विजय राठोड,
कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजनीश कामत, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, वनमंत्री गणेश नाईक, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आदी मान्यवरांनी दर्शन घेतले व आदरांजली वाहिली. ज्ञानाचा सागर, शिक्षण महर्षी, अत्यंत विद्वान, कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण या सारख्या विविध क्षेत्रात ऊतुंग कामगिरी करणारे थोर अजातशत्रू असणारे थोर व्यक्तिमत्व आपल्यातून हरवल्याची भावना सर्वांनीच यावेळी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या जीवनात शिक्षण, समाजकारण, वैद्यकीय क्षेत्र, सहकार, क्रीडा, कृषी, अशा विविध क्षेत्रात भरीव काम केले. त्यांचे कार्य महाराष्ट्र आणि संपूर्ण देश कधीही विसरू शकणार नाही. सर्वसामान्यांच्या दुःखात समरस होणारे हे व्यक्तिमत्व होते. त्यांचे जाणे हे सर्वांसाठी दुःखद आणि वेदनादायी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आणि पद्मश्री डी. वाय. पाटील साहेबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या रूपाने आपण ज्ञानाचा महासागर, शिक्षण महर्षी, आजातशत्रू लोकनेता हरपला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांची आणि आपली ओळख जवळपास 40 वर्षाहून ही जुनी आहे असे सांगून विविध पदांवरील काम करण्याचा त्यांना जो कार्यकाल मिळाला त्यामध्ये त्यांनी देशाच्या, महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूरच्या प्रगतीसाठी अखंड प्रयत्न केले. राजकारणात इतकी थोर व्यक्तिमत्वे फार कमी प्रमाणात आढळतात. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून त्यांना ईश्वर सांत्वना देवो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पद्मश्री डी. वाय. पाटील साहेबांचे पूर्ण आयुष्य हे अतिशय मोठ्या संघर्षाची यशोगाथा आहे. गरिबांची मुलेही कमी पैशांमध्ये डॉक्टर, इंजिनिअर झाली पाहिजेत या तळमळीतून शिक्षण क्षेत्रात उत्तुंग काम त्यांनी राज्यात आणि राज्याबाहेर केले आहे. अत्यंत धाडसी, अतिशय संघर्ष करणारा योध्दा अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राने फार मोठ्या कर्तुत्ववान नेत्याला गमावले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हे नाव महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला परिचयाचे आहे. स्व. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना विनाअनुदानित महाविद्यालयाचा निर्णय केल्यानंतर ज्या काहींनी इंजिनिअरिंग, मेडिकलसहित वेगवेगळ्या फॅकल्टीची महाविद्यालये उभी केली आणि यशस्वीपणे चालवली त्यात त्यांचा समावेश आहे. आता पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेची आठ विद्यापीठे आणि जवळपास ३०० महाविद्यालये इतका मोठा व्याप आहे. त्यामुळे स्व. वसंतदादांच्या विनाअनुदानित तत्त्वाला अनुसरून प्रचंड मोठा शैक्षणिक व्याप यशस्वीपणे वाढवणारे डी. वाय. पाटील होत. एक यशस्वी जीवन डी. वाय. दादा जगले.
खा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटलांच्या निधनाने महाराष्ट्राची आणि सर्व समाजाचीच अत्यंत हानी झाली आहे. त्यांनी उत्तम कार्य केले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात तर अनेक इन्स्टिट्यूशन (संस्था) त्यांनी निर्माण केल्या. त्यामुळे बहुजन समाजातली अनेक मुले-मुली शिकली व समाजाला आधार ठरली. छत्रपती घराण्याचा आणि डी. वाय. पाटील घराण्याचा स्नेह वर्षानुवर्ष दृढ असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar