करंजा मत्स्य बंदर प्रकल्प कामांसाठी अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर करावा - मुख्यमंत्री
मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा मत्स्य बंदराच्या प्रकल्पातून वार्षिक ४,५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता निर्माण होणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी १४९ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली
मुंबई


मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा मत्स्य बंदराच्या प्रकल्पातून वार्षिक ४,५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता निर्माण होणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी १४९ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली होती. मंजूर कामे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) पूर्ण केली असून उर्वरित कामे गतीने होण्यासाठी अनुभवी तंत्रज्ञ आणि आधुनिक यंत्रणेचा वापर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्यय अग्रक्रम समितीची बैठक झाली. यावेळी विविध विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली. मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन. यांनी करंजा बंदराच्या विकासाबद्दल माहिती सादर केली. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वित्त (व्यय) विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, सचिव आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, करंजा मत्स्य बंदर विकास प्रकल्प ५.२३ हेक्टर क्षेत्रावर विकसित करण्यात येत असून, या बंदरावर ६,६०० मच्छीमारांना सुविधा उपलब्ध होणार आहे. ही कामे पूर्ण करण्यास गती देण्यात यावी.

पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारने ५० : ५० या प्रमाणात हिस्सा आहे. आतापर्यंत १३६.३९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्य शासनाकडून ७४.९० कोटी रुपये असा निधी तर केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून १४ कोटी रुपये, केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून ६०.९० कोटी रुपये मंजूर करण्यात आला आहेत. यामध्ये मंजूर २४ कामांपैकी १३ पूर्ण झाली आहेत.

करंजा मत्स्य बंदर विकासासाठी अत्याधुनिक सुविधा विकसित

करंजा मत्स्य बंदराचा विकास पूर्ण झाल्यानंतर मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे. प्रकल्पांतर्गत आत्तापर्यंत अतिरिक्त क्वे वॉल, प्रवेश जलमार्गाचे रुंदीकरण, बोट पार्किंग, काँक्रीट पृष्ठभाग, चार आधुनिक मासळी लिलाव हॉल, मत्स्य प्रशासन कार्यालय, फिशिंग गिअर शेड, जाळी दुरुस्ती शेड, मच्छीमार विश्रांतीगृह, रेस्टॉरंट, रेडिओ कम्युनिकेशन स्टेशन, गार्ड हाऊस, कंपाऊंड वॉल आणि सुशोभीकरण आदी अत्याधुनिक सुविधा विकसित करण्यात येत आहेत.

उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाकडे (एमएफडीसी) प्रस्ताव प्राप्त झाला असून, करंजा मत्स्य बंदर विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी १५१.२९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शासनाने या प्रस्तावात आवश्यक सुधारणा करून पुनर्सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

या प्रकल्पांतर्गत ३७० रनिंग मीटर अतिरिक्त क्वे वॉल उभारण्यात येणार असून, प्रवेश जलमार्ग रुंदीकरण तसेच बोट पार्किंगची अतिरिक्त सुविधा विकसित करण्यात येणार आहे. मच्छीमारांसाठी चार आधुनिक मासळी लिलाव हॉल, मत्स्य प्रशासन कार्यालय, दोन फिशिंग गिअर शेड, दोन जाळी दुरुस्ती शेड, मच्छीमार विश्रांतीगृह, रेस्टॉरंट, रेडिओ कम्युनिकेशन स्टेशन, गार्ड हाऊस, कंपाउंड वॉल उभारण्यात येणार आहेत. बंदर परिसरात काँक्रीट पृष्ठभाग विकसित करून वाहतूक व माल हाताळणी अधिक सुलभ होणार आहे.

या सर्व सुविधांमुळे मत्स्य बंदराची कार्यक्षमता वाढणार असून मच्छीमारांना सुरक्षित, आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. तसेच मासळीच्या विक्री, साठवणूक व वाहतुकीची प्रक्रिया अधिक सुलभ होऊन मत्स्य व्यवसायाच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande