
सुरगाणा, ५ ऑगस्ट (हिं.स.) : सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाशिक ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक एस. स्वामी यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कठोर संदेश दिल्याचे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन स्वतंत्र कारवाया करत दोन पोलीस उपनिरीक्षकांना लाच घेताना अटक केली आहे.
यामध्ये डिसेंबर महिन्यात पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चौधरी यांना सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना एका खासगी इसमासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
या दोन्ही घटनांची गंभीर दखल नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस. स्वामी यांनी घेतली असून उपलब्ध माहितीनुसार पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची सुरगाणा येथून बदली करून त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आली आहे.
ग्रामीण पोलीस दलातील सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणांमध्ये पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेबाबतही चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्तीचा स्पष्ट संदेश मिळाला असल्याची चर्चा आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV