हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; १४५ रस्ते बंद, २२४ ट्रान्सफॉर्मर ठप्प
शिमला, 07 ऑगस्ट (हिं.स.)। हिमाचल प्रदेशात मान्सूनचा जोर कायम असून, गेल्या २४ तासांत राज्यभर मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्य आपत्कालीन संचालन केंद्राने शुक्रवारी सकाळी १० वाजता प्
हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; १४५ रस्ते बंद, २२४ ट्रान्सफॉर्मर ठप्प


शिमला, 07 ऑगस्ट (हिं.स.)। हिमाचल प्रदेशात मान्सूनचा जोर कायम असून, गेल्या २४ तासांत राज्यभर मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्य आपत्कालीन संचालन केंद्राने शुक्रवारी सकाळी १० वाजता प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राज्यातील १४५ रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत, २२४ वीज वितरण ट्रान्सफॉर्मर (DTR) बंद पडले आहेत, तर १४ पाणीपुरवठा योजना देखील प्रभावित झाल्या आहेत.

सततचा पाऊस आणि भूस्खलनामुळे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील एकूण १४५ रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. त्यापैकी मंडी जिल्ह्यात सर्वाधिक ६६ रस्ते बंद असून, कुल्लूमध्ये ३१ आणि सिरमौरमध्ये २८ रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. राज्यातील २२४ वीज ट्रान्सफॉर्मर बंद पडले असून, त्यापैकी केवळ मंडी जिल्ह्यातील १८२ ट्रान्सफॉर्मर ठप्प आहेत. तसेच १४ पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्यामुळे अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

शिमला येथील हवामान केंद्राच्या अहवालानुसार, धर्मशाळा येथे सर्वाधिक ७९ मिमी, जोगिंदरनगर येथे ७६ मिमी, मंडी येथे ६३.४ मिमी आणि राजधानी शिमला येथे ५४.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या एकत्रित मान्सून नुकसान अहवालानुसार, ३० जून ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मान्सूनशी संबंधित घटनांमध्ये राज्यातील १४२ जणांचा मृत्यू झाला असून २२४ जण जखमी झाले आहेत. या कालावधीत सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मिळून सुमारे ७९७.८६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान शिमला येथील हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. १० आणि ११ ऑगस्ट रोजी राज्यातील विविध भागांसाठी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तसेच मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रशासनाने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना नदी-नाले व ओढ्यांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे तसेच अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande