वीज गेली, महावितरण सुस्त; ग्रामस्थांनीच केबल आणून उजेड केला
रायगड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। येथील पिंपळभाट गावातील वीजपुरवठा तब्बल १२ तास खंडित राहिल्यानंतर महावितरणकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनीच पुढाकार घेत वीजपुरवठा सुरळीत केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महावितरणच्या कार्यपद्
Power outage; Mahavitaran sluggish; villagers themselves brought a cable to restore lighting.


रायगड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। येथील पिंपळभाट गावातील वीजपुरवठा तब्बल १२ तास खंडित राहिल्यानंतर महावितरणकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनीच पुढाकार घेत वीजपुरवठा सुरळीत केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपळभाट येथे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रार नोंदवली. मात्र अनेक तास उलटूनही वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही. त्यामुळे घरगुती कामे, पाणीपुरवठा, मोबाईल चार्जिंग तसेच लहान व्यावसायिकांचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले. रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधाराचा मोठा त्रास सहन करावा लागला.

अखेर ग्रामस्थांनी महावितरण कार्यालय गाठून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर आवश्यक केबलची व्यवस्था करून नागरिकांनीच दुरुस्तीच्या कामासाठी पुढाकार घेतला. ग्रामस्थांच्या सहकार्याने दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला.

या प्रकारामुळे, ‘वीज बिल भरण्याची जबाबदारी ग्राहकांची, मग सेवा देण्याची जबाबदारी कोणाची?’ असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. संबंधित अभियंता कर्तव्यावर असताना नशेत होता, असा आरोपही ग्रामस्थांनी केला असून त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande