अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या कार्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द
नागपूर, 12 सप्टेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून दि. १६ सप्टेंबर २०२४ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत केलेल्या कार्याचा संपूर्ण अहवाल आयोगाचे माजी उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महाराष्ट्राचे मुख्य
Report work SCST Commission CM Fadnavis


नागपूर, 12 सप्टेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून दि. १६ सप्टेंबर २०२४ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत केलेल्या कार्याचा संपूर्ण अहवाल आयोगाचे माजी उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील ‘रामगिरी’ निवासस्थानी भेट घेऊन त्यांना सुपूर्द केला.

तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त करून आयोगाचा उपाध्यक्ष ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याबद्दल ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्याच्या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाजाच्या विविध प्रश्नांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यात आला. या दौऱ्यांदरम्यान समाजातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तसेच त्यांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी उपाध्यक्षांच्या वतीने प्रयत्न करण्यात आले.

उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण आणि बेंचमार्क स्वरूपाचे निर्णय व उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये ८४१ ॲट्रॉसिटी प्रकरणांतील पीडितांच्या कुटुंबीयांना शासकीय सेवेत नोकरी मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक न्यायाशी संबंधित विविध प्रश्नांवर केलेले प्रभावी कार्य तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा विशेष उल्लेख करता येईल.

याशिवाय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देणे आणि दोन्ही आयोगांचे स्वतंत्र पृथक्करण करण्याच्या प्रक्रियेतही उपाध्यक्ष म्हणून ॲड. मेश्राम यांनी योगदान दिले. वंचित व दुर्बल घटकांच्या विविध प्रश्नांवर व्यापक स्वरूपात काम करण्याची संधी या कार्यकाळात त्यांना मिळाली.

या कार्याचा संपूर्ण अहवाल स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अहवालाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी केलेल्या कार्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“माझ्यावर विश्वास ठेवून ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याबद्दल तसेच माझ्या कार्याची दखल घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याबद्दल मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार. सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठीची माझी वाटचाल यापुढेही अधिक व्यापकपणे सुरू राहील,” असे यावेळी आयोगाचे माजी उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande