
रायगड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। येथे मोठे उद्योग येत असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कंपन्यांना त्रास देण्याऐवजी त्यांना सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. “कंपन्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचे काम खासदार सुनील तटकरे यांनी करू नये,” असा थेट हल्लाबोल आमदार महेंद्र थोरवे यांनी केला.
खालापूर -खोपोली येथील टाटा स्टील आणि गोदरेजसारखे मोठे उद्योग मतदारसंघात आले आहेत. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि कंपन्यांनाही त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य मिळावे, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे थोरवे यांनी सांगितले. टाटा कंपनीत तीन वर्षे काम करणाऱ्या कामगारांच्या मुलाखती घेऊन त्यांना कायमस्वरूपी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
टाटा स्टीलविरोधात झालेल्या आंदोलनावरही थोरवे यांनी टीका केली. हे आंदोलन स्थानिकांच्या रोजगारासाठी नसून काही जणांच्या ठेकेदारीच्या स्वार्थासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. संतोष बेलमारे यांच्यावरही त्यांनी कंपनीला त्रास देत असल्याचा आरोप केला. “स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे; मात्र कंपनीही सुरू राहिली पाहिजे. कंपन्या बंद करण्याची भूमिका आम्हाला मान्य नाही,” असे थोरवे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नारंगी परिसरात एमआयडीसीकडून सुमारे बाराशे एकर जमीन घेण्यात येत असून भविष्यात विविध कंपन्या येऊन स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा दावा त्यांनी केला. कंपन्या आणि स्थानिक यांच्यात समन्वय ठेवून रोजगाराचा प्रश्न सोडविण्याची भूमिका आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)