

* जिद्द, शैक्षणिक गुणवत्ता आणि समाजसेवेचा बहुमान
मुंबई, १५ सप्टेंबर (हिं.स.) : वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यश साजरे करण्यासाठी तसेच सामाजिक बदलासाठी कटिबद्ध असणारे प्रमुख समुदाय नेते, समाजसेवक आणि प्रभावकांचा (इन्फ्लुएन्सर्स) गौरव करण्यासाठी सीएमसीएफ (CMCF) द्वारे २२ व्या 'थँक्सगिव्हिंग सर्व्हिस आणि विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे' आयोजन करण्यात आले होते. मंगला प्रकाश आणि शैलेश कसबे यांना 'करुणा पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि प्रसिद्ध कलाकार दांपत्य रोशेल राव सिक्वीरा (अभिनेत्री आणि मॉडेल) व कीथ सिक्वीरा (अभिनेता आणि माजी मॉडेल) यांनी सहानुभूती वाढवणे, एकता जोपासणे आणि प्रेमाच्या माध्यमातून द्वेषावर मात करणे यावर आपले महत्त्वपूर्ण विचार मांडले.
या सोहळ्यात तीव्र वैयक्तिक आणि आर्थिक संकटांवर मात करत १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मदत म्हणून शैक्षणिक भेटवस्तू आणि गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आले.
उत्कृष्ट समाजसेवा, सामाजिक न्याय आणि विकासातील योगदानाबद्दल प्रमुख पाहुणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये फादर फ्रेझर, ॲड. इरफान इंजिनियर, डॉल्फी डिसोझा, नवीन कुमार (प्रसिद्ध बासरी वादक), पास्टर बिजू थंपी, समीर वागळे, शाकीर शेख आणि शबनम शेख यांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी