
जरांगेंचे गेवराई, बीडमध्ये मराठा समाजाकडून जल्लोषात स्वागत
जालना, 15 सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे गेल्या 18 दिवसांपासून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे अखेर आज, मंगळवारी 15 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सकाळी आरोग्य तपासणी केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तसेच गावातील दोन मंदिरांत दर्शन घेत त्यांनी मुंबईकडे कूच केले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी वैद्यकीय उपचारही बंद केले असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्यांच्या मुंबईकडे प्रस्थानामुळे प्रशासनाची धावपळ वाढली असून, अंतरवाली सराटीपासून शहागडपर्यंत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जरांगे यांच्या आंदोलनाचा हा पुढील निर्णायक टप्पा मानला जात आहे. हे त्यांचे अकरावे बेमूदत उपोषण असून, मुंबईच्या दिशेने जाण्याची ही तिसरी वेळ आहे. सरकारने चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट केले असले तरी केवळ आश्वासनांवर समाधान न मानता मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जरांगे मुंबईकडे रवाना झाल्यानंतर त्यांच्या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
अंतरवाली सराटी, वडीगोद्री, धुळे-सोलापूर महामार्गावरील डावा कालवा, वडीगोद्री टी-पॉईंट उड्डाणपूल, राजस्थानी हॉटेल, गहिनीनाथ नगर, महाकाळा, अंकुशनगर आणि पैठण फाटा, शहागड या महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे.या बंदोबस्तामध्ये तीन उपविभागीय पोलिस अधिकारी, 10 पोलिस निरीक्षक, 30 सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, 300 पोलिस अंमलदार, 265 होमगार्ड तसेच आरसीपीच्या दोन प्लाटूनचा समावेश आहे. एकूण 648 पोलिस अधिकारी-कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणेतील जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
ताफ्यात दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिकाजरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाणाऱ्या ताफ्यात एक डिफेंडर आणि एक फॉर्च्युनर अशा दोन वाहनांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत 2 रुग्णवाहिकाही ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आली आहे.
जालना पोलिसांच्या दोन अंगरक्षकांबरोबरच छत्रपती संभाजीनगरच्या अतिरिक्त स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे अंगरक्षकही तैनात करण्यात आले आहेत. श्रीराम कुरणकर, सरपंच पांडुरंग तारख, बद्रीनाथ तारख, स्वप्निल तारख, संजय कटारे, गंगाधर काळकुटे, किशोर बलांडे आणि गणेश काळे हे मोजके सहकारी त्यांच्या सोबत आहेत.
जरांगे पाटील यांनी यापूर्वी मुंबईत मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव जमा झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आपण शक्यतो एकटेच मुंबईला जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात करताना त्यांच्यासोबत मोजके सहकारी आहेत.
आझाद मैदानासाठी परवानगी नाकारली
मुंबईतील आझाद मैदानावर 19 सप्टेंबरपासून आंदोलन करण्याचा जरांगे पाटील यांचा मानस आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
जरांगे पाटील यांनी सुरुवातीला पाच हजार लोकांसह आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर त्यांनी केवळ 50 लोकांसह आंदोलन करण्याची तयारी दर्शवत परवानगी मागितली. मात्र, दोन्ही मागण्या नाकारण्यात आल्या. त्यामुळे आता मुंबई पोलिस आणि जरांगे पाटील यांच्यातील पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.परवानगी नाकारण्यात आली असली तरी मुंबईकडे जाण्याच्या निर्णयावर जरांगे ठाम आहेत. “मरण आलं तरी चालेल, पण मी जाणारच,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. त्यासोबतच त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश आहे.
‘सगे-सोयरे’ अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी.
सातारा आणि कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटची अंमलबजावणी करावी.
पात्र मराठा समाजबांधवांना कुणबी प्रमाणपत्रे आणि वैधता प्रमाणपत्रे देण्यात यावीत.
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.
या मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
गेवराईत उत्स्फूर्त स्वागत
अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघालेला जरांगे यांचा ताफा सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास गेवराई शहरात दाखल झाला. त्यांच्या स्वागतासाठी गेवराई शहरासह तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव दाखल झाले होते.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. क्रेनच्या सहाय्याने भव्य पुष्पहार तयार करण्यात आला होता. काही ठिकाणी तोफांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
जरांगे यांचा ताफा शहरात दाखल होताच घोषणांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. हातात भगवे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर गर्दी झाल्याने काही काळ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
ताफ्यासोबत असलेल्या कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याचे पाणी यासह विविध व्यवस्था करण्यात आली होती. गेवराई शहराबरोबरच तालुक्यातील अनेक गावांमधून समाजबांधव जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आले होते.
बीडमध्येही हजारोंची गर्दी
गेवराईनंतर जरांगे यांचा ताफा त्यांच्या आंदोलनाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात दाखल झाला. रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास त्यांचे बीडमध्ये आगमन झाले.
बीडमध्येही त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरले. गेवराईपासूनच त्यांच्या स्वागताला सुरुवात झाली होती. बीडमध्ये दाखल होताच घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे सुरू असलेल्या या प्रवासाला मराठा समाजाचा मिळणारा प्रतिसाद आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या वेशीवर अडवले जाणार ?
मुंबईत सध्या गणेशोत्सवाचा काळ असल्याने मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जरांगे यांना मुंबईच्या वेशीवरच रोखण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, मुंबई पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली असली तरी आपण मुंबईला जाणारच, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या मुंबई प्रवेशाच्या वेळी प्रशासन आणि आंदोलक यांच्यात काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी