गौराईच्या खरेदीसाठी बाजारात भाविकांची झुंबड; गौरीचे विविध प्रकारचे सुंदर मुखवटे उपलब्ध
अमरावती, 15 सप्टेंबर (हिं.स.)। गौरी (महालक्ष्मी)च्या मुखवट्यांनी बाजार सजला आहे. बाजारात मुखवट्यांच्या वैविध्यपूर्ण सादरीकरणामुळे ठिकठिकाणी ग्राहकांचे चित्त वेधले जात आहे. गणपती उत्सव दोन दिवसांवर तर गणेशस्थापनेनंतर ३ दिवसांनी यंदा गौरी (महालक्ष्म
गौराईच्या खरेदीसाठी बाजारात भाविकांची झुंबड; गौरीचे विविध प्रकारचे सुंदर मुखवटे उपलब्ध


अमरावती, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

गौरी (महालक्ष्मी)च्या मुखवट्यांनी बाजार सजला आहे. बाजारात मुखवट्यांच्या वैविध्यपूर्ण सादरीकरणामुळे ठिकठिकाणी ग्राहकांचे चित्त वेधले जात आहे. गणपती उत्सव दोन दिवसांवर तर गणेशस्थापनेनंतर ३ दिवसांनी यंदा गौरी (महालक्ष्मींचे) आगमन होणार आहे. बाजारात या मुखवट्यांह गौरी-गणपतींसाठी लागणारे विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली आहे.

मुखवट्यांचे दर यंदा ५५१ रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यत आहेत. यावर्षी सणावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात होते, परंतु दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने बाजारात चैतन्य निर्माण केले आहे. विदर्भात तर गणपती उत्सवादरम्यान महालक्ष्मी घरोघरी बसवण्याची प्रथा आहे. हा एक वार्षिक उत्सव असल्याने यात घरोघरी उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण असते. या सणासाठी खरेदी करताना गृहिणीदेखील उत्साही असतात व तिचा हात खरेदीसाठी मोकळा असतो. साड्या, कोठ्या, दागदागिने, महालक्ष्म्यांच्या बाळांचे कपडे, विविध अलकांरिक वस्तू, सजावटीसाठी लागणारे मखर आदी बाजारात आले आहेत.बाजारात मखर, विद्युत माळा, पाना-फुलांच्या झिरमाळ्या, आकर्षक पडदे, पताका, हार, कागदी साहित्य, स्टेशनरी साहित्य, रांगोळी या सजावटीच्या साहित्याबरोबरच अगरबत्ती, कापूर, धूप या पूजेच्या साहित्यांबरोबरच नारळ, फळे, गौरीसमोर ठेवण्यासाठी फराळ यांचीही दालने सजली आहेत.

यावेळी बाजारात गौरी तयार करण्यासाठी लागणारे स्टँड, मुखवटा, साडी, दागिने, पाऊलजोड आणि डेकोरेशनसाठी लागणाऱ्या दिव्याचा माळा उपलब्ध आहेत. सध्या बाजारात गौरीचे विविध प्रकारचे सुंदर मुखवटे उपलब्ध आहेत. त्यामध्ये खळी मुखवटा, हसरा मुखवटा, अमरावती मुखवटा, सातारी मुखवटा, महालक्ष्मी मुखवटा आणि एकवीरा मुखवटा आदिना विशेष मागणी आहे.

दागिन्यांची रेंज मोठी

गौरीसाठी नानाविध दागिन्यांची मोठी रेंज आली आहेत. यात मोत्यांचे, डायमंड, गोल्डन, सिलव्हर असे दागिने बाजारात आलेले आहेत. हार कानातले, बिंदी, बांगड्या, बाजुबंद, कमरपट्टा, हल्ला, लक्ष्मीहार, मंगळसूत्र, एकदानी, राणीहार, कुंदनहार, तोरड्या, बिच्छवे असे अनेक दागिने आहेत. विविध आकारातील व डिझाईन मुकूट देखील उपलब्ध आहेत. शिवाय कलात्मक केसांचा विग व इतर साहित्यही आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande