मुथूट फिनकॉर्पच्या गैरव्यवहारात १६८ ग्राहकांचे सोने दुसऱ्यांच्या नावावर
२१७ ग्राहकांच्या तक्रारी; पोलिस व कंपनीकडून स्वतंत्र तपास सुरू अमरावती, १६ सप्टेंबर (हिं.स.) : शहरातील विमको टॉवर येथील मुथूट फिनकॉर्पच्या शाखेत ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्यात गैरव्यवहार केल्याप्रकरणी सव्वा महिन्यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला
मुथूट फिनकॉर्प’मध्ये 168 ग्राहकांचे तारण सोने एकाचे दुसऱ्याच्या नावावर


२१७ ग्राहकांच्या तक्रारी; पोलिस व कंपनीकडून स्वतंत्र तपास सुरू

अमरावती, १६ सप्टेंबर (हिं.स.) : शहरातील विमको टॉवर येथील मुथूट फिनकॉर्पच्या शाखेत ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्यात गैरव्यवहार केल्याप्रकरणी सव्वा महिन्यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा कोतवाली पोलिसांकडून तपास सुरू असून, कंपनीकडूनही शाखेतील व्यवहारांची अंतर्गत चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत १६८ ग्राहकांचे तारण सोने एका ग्राहकाच्या नावावरून दुसऱ्या ग्राहकाच्या नावावर दाखविण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

या प्रकरणात कोतवाली पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या ग्राहकांची संख्या आता सुमारे २१७ वर पोहोचली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सुमारे साडेसहा ते सात किलो सोन्याचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, पोलिस आणि मुथूट फिनकॉर्पच्या प्राथमिक तपासणीनुसार सर्व तक्रारदारांचे सोने गायब झालेले नसल्याचे समोर येत आहे.

काही ग्राहकांचे तारण सोने बँकेत सुरक्षित असल्याचे आढळले आहे. मात्र, संबंधित सोने एका ग्राहकाच्या नावाऐवजी दुसऱ्याच्या नावावर तारण दाखविण्यात आले आहे. त्यामुळे नेमके कोणत्या ग्राहकाचे सोने कोणाच्या नावावर तारण ठेवण्यात आले, याचा तपास सध्या सुरू आहे. परिणामी, प्रत्यक्षात अपहार झालेल्या सोन्याचे प्रमाण तक्रारदारांनी केलेल्या अंदाजापेक्षा कमी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१६८ ग्राहकांच्या खात्यांची पडताळणी

कंपनीच्या अंतर्गत तपासणीत १६८ ग्राहकांच्या खात्यांवरील तारण सोने एका ग्राहकाच्या नावावरून दुसऱ्या ग्राहकाच्या नावावर दाखविल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केवळ सोने गायब झाले आहे का, यापेक्षा तारण सोन्याची नोंद, कर्ज व्यवहार आणि संबंधित खात्यांची हाताळणी नेमकी कोणत्या पद्धतीने करण्यात आली, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

संबंधित ग्राहकांचे सोने सुरक्षित आहे का, त्याची मालकी कोणाची आहे आणि तारण नोंदी कोणाच्या नावावर आहेत, याची पडताळणी पोलिस व कंपनीकडून करण्यात येत आहे.

आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागविली

या प्रकरणात पोलिसांनी एमपीआयडी कायद्यातील कलम ३ वाढविले आहे. यापूर्वी पोलिसांनी सब-रजिस्ट्रार कार्यालयाशी पत्रव्यवहार करून तिन्ही आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागविली होती. आता जिल्ह्यातील त्यांच्या मालमत्तेची माहिती मिळविण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.

आरोपींच्या मालमत्तेची माहिती प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाची परवानगी घेऊन ती जप्त करण्याची प्रक्रिया करता येऊ शकते. अशा मालमत्तेतून फसवणूक झालेल्या ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता असल्याची माहिती कोतवालीचे ठाणेदार पीआय रोषण सिरसाठ यांनी दिली.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी ५ ऑगस्ट रोजी तत्कालीन शाखा व्यवस्थापक शुभम रवींद्र वासेवाय (३१), सूरज अनिल खैरकर (३२) आणि धीरज पंचमराव सिरसाट (२९) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

ग्राहकांना प्रत्यक्ष दिलासा कधी?

कंपनीच्या अंतर्गत चौकशीत एका ग्राहकाच्या नावावरील तारण सोने दुसऱ्या ग्राहकाच्या नावावर दाखविल्याची १६८ प्रकरणे समोर आली आहेत. संबंधित ग्राहकांनी किती रक्कम भरली, कधी भरली आणि किती रक्कम बाकी आहे, याची माहिती घेतली जात असून ती मुख्यालयाकडे पाठविण्यात येत आहे. मुख्यालयाकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ज्यांचे सोने व खाते व्यवस्थित असल्याचे आढळले आहे, त्यांच्यासाठी शाखेचे व्यवहार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती मुथूट फिनकॉर्पचे एरिया मॅनेजर आतिष धोटे यांनी दिली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande