
जळगाव, 16 सप्टेंबर (हिं.स.)गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेहुणबारे पोलिसांकडून सुरू असलेल्या पेट्रोलिंगदरम्यान अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ३२ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा, तसेच १ लाख रुपये किमतीची ओम्नी कार आणि १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण ४ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पथक गणेशोत्सवानिमित्त पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव गावाजवळ एम.एच.-१८-एस-६६२ क्रमांकाची काळ्या रंगाची ओम्नी संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव हितेश अनिल अहिरराव (वय २७, रा. मेहुणबारे, ता. चाळीसगाव) असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ वाहन ताब्यात घेत गुटख्यासह मोबाईल जप्त केला. या प्रकरणी पोलिस नाईक दिपक महाजन यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न व सुरक्षा मानके अधिनियम २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर