लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ रशियाच्या दौऱ्यावर रवाना
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर (हिं.स.) |लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ 16 ते 18 सप्टेंबर 2026 दरम्यान रशियाच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य अधिक मजबूत करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे. या दौऱ्यादरम्यान, लष्कर
लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ


नवी दिल्ली, 16 सप्टेंबर (हिं.स.) |लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ 16 ते 18 सप्टेंबर 2026 दरम्यान रशियाच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य अधिक मजबूत करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.

या दौऱ्यादरम्यान, लष्कर प्रमुखांना समारंभपूर्वक मानवंदना दिली जाईल. त्यानंतर ते मॉस्को येथील 'टोम्ब ऑफ द अननोन सोल्जर' (अज्ञात सैनिकाचे स्मारक) येथे हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतील. रशियन भूदलाचे सरसेनापती कर्नल जनरल आंद्रे निकोलायेविच मोर्दविचेव्ह यांच्याशी व्यावसायिक लष्करी सहकार्य आणि प्रशिक्षण यांसह परस्पर हिताच्या मुद्द्यांवर ते चर्चा करतील.

लष्करप्रमुख मॉस्कोमधील 'नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटर'ला भेट देतील आणि रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच संरक्षण उद्योग आणि खरेदी विभागाचे उप-संरक्षण मंत्री वासिली सर्गेयेविच ओस्माकोव्ह यांच्याशी संवाद साधतील. या बैठकांच्या निमित्ताने समकालीन लष्करी घडामोडी आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उपाययोजनांबाबत दृष्टिकोन व विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळेल.

या दौऱ्याचा एक भाग म्हणून, जनरल धीरज सेठ सेंट पीटर्सबर्गलाही भेट देतील; तिथे ते 'मिखाइलोव्स्काया मिलिटरी आर्टिलरी अकादमी'ला भेट देतील आणि तिथल्या नेतृत्वाशी आणि प्राध्यापकांशी संवाद साधतील.

सातत्यपूर्ण लष्करी मुत्सद्देगिरी आणि दोन्ही देशांच्या लष्करांमधील परस्पर सहकार्याला उभय देशांचे महत्त्व या दौऱ्यातून अधोरेखित होते.या संवादांमधून लष्करी सहकार्य अधिक दृढ होईल आणि भारत व रशिया यांच्यातील दीर्घकालीन संरक्षण संबंध अधिक मजबूत होतील, अशी अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande