
नवी दिल्ली, १६ सप्टेंबर (हिं.स.) पाकिस्तानी नौदलाच्या जहाजाची भारताच्या नौदलाच्या जहाजाशी झालेल्या धडकेवर भारताने तीव्र भूमिका घेतली असून, दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या प्रभारी प्रमुखांना बोलावून तीव्र निषेध नोंदवला आहे. भारताने ही संपूर्ण घटना अस्वीकार्य आणि अव्यावसायिक वर्तन असल्याचे म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही घटना आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत घडली. जरी या धडकेमुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नसले तरी, पाकिस्तानी नौदलाच्या जहाजाचे वर्तन हे लष्करी कवायती, डावपेच आणि सैन्याच्या हालचालींविषयी पूर्वसूचनेबाबतच्या भारत-पाकिस्तान कराराच्या (एप्रिल १९९१) कलम १० चे थेट उल्लंघन आहे.
भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व लष्करी तुकड्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय करारांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे, हे त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या प्रभारी राजदूतांना दिले आहेत. याव्यतिरिक्त, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या प्रभारी दूतांना या घटनेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे असाच तीव्र निषेध नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
१५ सप्टेंबरच्या संध्याकाळी, उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात नियमित निगराणी मोहिमेवर तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या एका आघाडीच्या युद्धनौकेच्या अगदी जवळ एक पाकिस्तानी नौदल जहाज आले. पाकिस्तानी जहाजाने अव्यावसायिक आणि अत्यंत असुरक्षित डावपेच केले, ज्यामुळे दोन्ही जहाजांची टक्कर झाली. पण, या घटनेत कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे