खालापूर: रिलायन्स टाऊनशिपमध्ये घरफोडी, ९८ हजारांचा ऐवज लंपास
लोधीवलीत बंद घराचे लॅच तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी; खालापूर पोलिसांत गुन्हा दाखल
khalapur


रायगड, 16 सप्टेंबर (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे लोधीवली येथील रिलायन्स टाऊनशिपमध्ये एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सुमारे ९८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोधीवली येथील रिलायन्स टाऊनशिपमधील घर क्रमांक बी-३३ मध्ये फिर्यादी राहतात. घर बंद असताना ही चोरी घडली. अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे लॅच कशाच्या तरी साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाची उचकापाच करत त्यामध्ये ठेवलेले एकूण ९८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान साहित्य लंपास केले. फिर्यादी परत आल्यानंतर घराचा दरवाजा तुटलेला दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला.

या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या चोरीप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४०४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(४), ३३१(३) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक (पोसई) हाके करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande