
सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सव मंडळाच्या ५०० ड्रेससाठी प्रत्येकी ६०० रुपये याप्रमाणे टेलरला देण्यासाठी तब्बल तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, एवढी रक्कम देण्यास नकार देत दरवर्षीप्रमाणे २५ हजार रुपये वर्गणी देण्याची तयारी दर्शविल्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी निराळे वस्ती येथील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाचा सदस्य नेताजी शिवाजी शिंदे याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुरारजी पेठ, सोलापूर येथील ६७ वर्षीय हॉटेल व्यावसायिक एकनाथ सोपान घाडगे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. फिर्यादी यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हॉटेल आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजता नेताजी शिवाजी शिंदे यांनी मंडळाच्या नावाने ५०० ड्रेससाठी प्रत्येकी ६०० रुपये याप्रमाणे एकूण तीन लाख रुपयांची मागणी केली.यावेळी घाडगे यांनी तीन लाख रुपये देण्याची आपली आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगत दरवर्षीप्रमाणे २५ हजार रुपये वर्गणी देतो, असे सांगितले. तसेच यापूर्वी मंडळाला दोन लाख रुपये दिल्याचेही त्यांनी शिंदे यांना सांगितले. मात्र, तीन लाख रुपये देण्याचा आग्रह कायम ठेवत शिंदे याने फिर्यादीच्या अंगावर येऊन शिवीगाळ केली आणि रक्कम न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या घाडगे यांना चक्कर येऊन ते खाली पडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वपोनि महादेव राऊत यांनी तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
धार्मिक अथवा सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी देण्याबाबत कोणी जबरदस्ती करीत असल्यास, वर्गणीच्या पैशांसाठी धमकावत असल्यास किंवा शिवीगाळ करून त्रास देत असल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गणेशोत्सव मंडळांनी नागरिकांकडून स्वेच्छेने दिली जाणारी वर्गणी स्वीकारून उत्सव शांततेत आणि सलोख्याने साजरा करावा. नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड