
मुंबई, 16 सप्टेंबर (हिं.स.)। अभिनेता आदिनाथ कोठारेनं आजवर वेगवेगळ्या भूमिकांतून स्वतःच्या उत्तम अभिनयाचा ठसा मराठी-हिंदी कलाकृतींतून उमटवला आहे. आता आदिनाथ मिरांडा वॉर्निंग या चित्रपटातून पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. येत्या २७ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज मार्फत मिरांडा वॉर्निंग या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे तर अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटच्या सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रच्या कल्पक जोशी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. सचिन धोत्रे यांनी २०२३ मध्ये 'गेट-टुगेदर' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर 'मिरांडा वॉर्निंग' या चित्रपटातून त्यांनी वेगळा प्रयोग केला आहे. रवींद्र मठाधिकारी, सायली मठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. फार्महाऊसवर एक खूनाची घटना घडते आणि त्यानंतर सुरु होतो एक थरारक शोध. या शोधात काय काय घडतं याची रंजक गोष्ट मिरांडा वॉर्निंग या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारेसह उत्तम स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेन्स, थ्रिलर प्रकारातील चित्रपटांना वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न मिरांडा वॉर्निंग या चित्रपटातून करण्यात आला आहे. उत्कृष्ट कथानक, कसलेले कलाकार, तांत्रिकदृष्ट्या सक्षम कलाकृती ही मिरांडा वॉर्निंग चित्रपटाची वैशिष्ट्य आहेत. आदिनाथ कोठारेचा उत्तम अभिनय आणि त्यात खूनाचा शोध घेणारा रफटफ पोलिस अधिकारी हेही महत्त्वाचं वेगळेपण आहे. त्यामुळे मिरांडा वॉर्निंग या नावापासून चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule