
मुंबई, 16 सप्टेंबर (हिं.स.) - गणपती बाप्पाशी असलेलं नातं हे मेघना एरंडे यांच्या आयुष्याचा लहानपणापासूनच एक सुंदर भाग राहिलं आहे. एरंडे कुटुंबात बालपणी अनुभवलेला गणेशोत्सव, लग्नानंतर जोशी कुटुंबात जपलेल्या परंपरा आणि आता ‘सनई चौघडे’ मालिकेतून परब कुटुंबाचा गणेशोत्सव अनुभवण्याचा मिळालेला योग, असा त्यांच्या गणेशोत्सवाचा सुंदर प्रवास आहे. बाप्पासोबतचं हे नातं त्यांच्यासाठी श्रद्धेपलीकडचं असून एका जिवलग मित्रासारखं आहे. यंदाच्या कोकणातील गणेशोत्सवाच्या चित्रीकरणाने या नात्यात आणखी एका खास आठवणीची भर पडली. आपल्या गणेशोत्सवाच्या आठवणी आणि बाप्पासोबतच्या या खास नात्याबद्दल सांगताना मेघना एरंडे-जोशी म्हणाल्या, “यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे, कारण आतापर्यंत मी फक्त एरंडे आणि जोशी हे दोनच गणेशोत्सव साजरे करत होते. पण या वर्षीपासून परबांचा गणेशोत्सवही साजरा करणार आहे. माझ्या जन्माच्या आधीपासून एरंडे कुटुंबात गणेशोत्सव साजरा केला जातो. मी घरातली सगळ्यात लहान मुलगी असल्यामुळे गणपती आल्यावर मला प्रसाद वाटप अशी छोटी कामं दिली जायची. लग्न होऊन जोशी कुटुंबात आल्यानंतर स्वयंपाकापासून गणेशोत्सवातील इतर सगळ्या गोष्टी करायला शिकले. आता मला गणपती स्थापनेची थोडीफार पूजा देखील सांगता येते. गणेशोत्सव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण यावर्षी आम्ही परब कुटुंबीय म्हणून कोकणातला गणेशोत्सव पहिल्यांदा अनुभवला. अर्थात, गणपती बसण्याच्या आधीच आमचं शूटिंग झालं होतं, त्यामुळे मला तो पूर्ण फील अनुभवता आला. याआधी मी कधीच कोकणात गेले नव्हते. ‘सनई चौघडे’मध्ये ज्या प्रकारे हा सगळा गणेशोत्सव पुन्हा उभा केला गेला, ते खूप सुंदर होतं. हरतालिकेपासून गौरीपर्यंत सगळंच त्यात आहे. तुम्ही ते मालिकेत प्रत्यक्ष बघालच. कोकणात झालेल्या गणेशोत्सवाच्या या शूटिंगमुळे माझा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे.
सुरुवातीलाच जेव्हा ‘सनई चौघडे’च्या टीमला गणेशगल्लीच्या राजाच्या पाद्यपूजनासाठी नेण्यात आलं, तेव्हापासूनच आमच्या सगळ्यांचा गणेशोत्सव सुरू झाला. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खऱ्या अर्थाने खूप स्पेशल आहे. माझ्या गणेशोत्सवाच्या खूप छान आठवणी आहेत. वयाच्या सातव्या वर्षी माझा पहिला पब्लिक परफॉर्मन्स गणेश मंडळाच्या स्टेजवर झाला होता. तिथून आज ३८ वर्षांचा माझा प्रवास झाला आहे. यावर्षी मला जोशी गणपती, एरंडे गणपती आणि परब गणपतीची आरती करता आली, याचा मला खूप आनंद आहे. त्याचबरोबर आणखी एक खास गोष्ट म्हणजे ‘झी मराठी’च्या ‘उत्सव गणेशाचा’ या कार्यक्रमाला मी आतापर्यंत व्हॉइस ओव्हर दिला आहे. पण यावर्षी मला निवेदिता सराफ आणि हर्षदा खानविलकर यांच्यासोबत तिथे देवाची आरती करता आली आणि त्यांच्या बरोबर उभं राहण्याचा मान मिळाला. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, ज्या ज्या गोष्टींची मी स्वप्नं पाहिली, त्या त्या गोष्टी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने माझ्यासाठी सत्यात उतरत आहेत. म्हणूनच यावर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास आहे. गणेशोत्सवाशी जोडलेल्या माझ्या अनेक सुंदर आठवणी आहेत. एकदा रामोजी फिल्म सिटीमध्ये मी १५ तासांचं लाईव्ह परफॉर्मन्स केलं होतं, ज्याचं खूप कौतुक झालं. त्यानंतर दूरदर्शनवरही गणपती लाईव्ह केलं आहे. गणेशोत्सवातील अनेक कार्यक्रम मी केले आहेत. पाच दिवस माझ्या घरातच गणपती असल्यामुळे पहिले पाच दिवस मी घरातच ॲक्टिव्ह असते. त्यानंतरच्या दिवसांत मी कार्यक्रम करते आणि होस्ट करते. गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या कथा मी स्वतः सांगते. ‘बाल गणेश’चं डबिंग करत असल्यामुळे हिंदी, इंग्रजी आणि मराठीमधील अनेक कथा मला माहिती आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माझ्या खूप सुंदर आठवणी आहेत. मला खूप चांगले मोदक बनवता येतात, जे मी फक्त गणपतीमध्येच बनवते. कारण या काळात माहेरचे आणि सासरचे सगळे पाहुणे आमच्या घरी येतात. हरतालिकेच्या कार्यक्रमात मला मंगळागौरीचे सुंदर खेळही खेळता येतात. नैवेद्य बनवणे, आरती म्हणणे, गणपतीच्या कथा वाचणे, पूजेची तयारी करणे, आरतीची तयारी करणे आणि सगळ्यांना आमंत्रण देणे, ही सगळी कामं मला मनापासून करायला आवडतात.
रात्रीची आरती झाल्यानंतर मी १०-१५ मिनिटं एकटी बाप्पासमोर बसते. तेव्हा माझ्या आणि बाप्पामध्ये गप्पा असतात. बाप्पाकडे बघताना मला त्यांच्या डोळ्यातला जिवंतपणा जाणवतो. त्यामुळे कुठलाही गणपती बसला असला तरी त्याचे डोळे मला खूप भावतात. विसर्जनाच्या वेळी मन खूप भरून येतं आणि पुन्हा ते पुढच्या वर्षी कधी येतील याची मी वाट बघत असते.
बाप्पांनी मला नेहमीच सगळ्या कठीण प्रसंगातून बाहेर काढलं आहे. स्वामी आणि बाप्पा हे माझे दोन इष्ट आहेत. लहानपणापासूनच ‘गणपती बाप्पा मोरया’ असं म्हटल्याशिवाय मी कुठल्याही प्रोजेक्टची सुरुवात कधीच केलेली नाही. आमचं शूटिंग पॅकअप होतं तेव्हाही आम्ही ‘गणपती बाप्पा मोरया’ असंच म्हणतो. माझा अनुभव आहे की बाप्पा सतत माझ्यासोबत असतात. पदोपदी मला त्याची प्रचिती मिळत असते की ते माझी मदत करत आहेत. त्यांनी मला अनेक संकटातून बाहेर काढलं आहे. खरंच मला असं वाटतं की, खूप मोठं संकट येण्याआधीच गणपती बाप्पा माझी मदत करतात. अशी माझी अनुभूती आहे. २०१० मध्ये माझं लग्न झालं. त्याआधी मी दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात होते. पण लग्नानंतर पुन्हा त्याच्या दर्शनाला जाण्याचा योग आला नाही. यावर्षी मात्र ‘सनई चौघडे’च्या टीमसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायला मला नक्की आवडेल. २०१० पासून पवईमध्ये जे गणपती बसतात, त्यांच्या दर्शनाला मी माझ्या मुलीला घेऊन न चुकता जाते. गणपतीच्या दर्शनासाठी मला एक वेगळाच जोश, नवी चेतना आणि ऊर्जा मिळते. माझी स्पेशल आठवण सांगायची झाली तर मला असं वाटतं की, गणपती बाप्पा माझ्या मनातलं सगळं नक्की ऐकतात आणि ते पूर्णही करतात. आमच्या शेजारी आठवले आजी होत्या. त्या सिद्धिविनायक मंदिरात मुख्य आचारी होत्या. त्या रोज माझ्यासाठी सिद्धिविनायकाचा गजरा आणि प्रसादातला मोदक आणायच्या. त्यामुळे पहिली ते दहावीपर्यंत मी रोज केसांमध्ये सिद्धिविनायकाचा गजरा घालून शाळेत जायचे. माझा डब्बाही सिद्धिविनायकाचा प्रसाद असायचा. त्यामुळे मला वाटतं की मी खूप भाग्यवान आहे आणि अशीच भाग्यवान राहीन. माझ्या मुलीचा जन्मही मंगळवारचा आहे. माझं आणि बाप्पाचं एक वेगळं, निरागस, निखळ आणि नावखंळ असं मैत्रीचं नातं आहे आणि ते कायम असंच राहील. गणपती बाप्पा मोरया!”
मेघना एरंडे-जोशी यांच्यासाठी गणेशोत्सव हा केवळ सण नाही, तर त्यांच्या आयुष्यभराच्या आठवणी, कुटुंबाच्या परंपरा, कामाचा प्रवास आणि बाप्पाशी जोडलेला विश्वास यांचा सुंदर संगम आहे. यंदा ‘सनई चौघडे’च्या माध्यमातून कोकणातील गणेशोत्सव अनुभवताना या नात्यात आणखी एका खास आठवणीची भर पडली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी