
रत्नागिरी, 16 सप्टेंबर (हिं.स.) । गणेशोत्सवात बुद्धीची देवता असलेल्या लाडक्या बाप्पाची आराधना करताना, आपण निसर्ग देवता आणि जलदेवतेची पूजा करणेदेखील आपले कर्तव्य आहे. विसर्जनाच्या नावाखाली जलस्रोत दूषित न करता त्यांचे निर्मळ स्वरूप अबाधित राखू या, असे आवाहन दापोलीच्या निवेदिता प्रतिष्ठानने केले आहे.
बाप्पाला निरोप देताना होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रतिष्ठानने नागरिकांना घरच्या घरी किंवा प्रशासनाने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात २६ ते ३० लाख श्री गणेशमूर्तींचे विसर्जन दीड दिवस, गौरी विसर्जन आणि बारा दिवसांनी करण्यात येते. प्रतिवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती जलस्रोतांमध्ये निर्माल्य आणि इतर पूजा साहित्यासमवेत विसर्जित करण्यात येतात. यामध्ये सकारात्मक बदल घडवणे प्रत्येकाच्या हातात आहे.
याकरिता निवेदिता प्रतिष्ठानने काही सोप्या उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार घरच्या आवारात किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करावे. नागरिकांनी आपल्या घराच्या आवारात (बादली किंवा टबमध्ये/ अडीचशे लिटरचे पिंप) अथवा स्थानिक प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावातच बाप्पाचे विसर्जन करावे. विसर्जनानंतर पाणी आपल्या आवारातीलच झाडाच्या बुंध्यात समर्पित करावे. शाडूची माती गोळा करून मूर्तिकारांकडे परत द्यावी आणि मूर्तिकारांनीही ती सहज स्वीकारावी. यामुळे नैसर्गिक नद्या आणि जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होईल.
जलदेवतेचे निर्मळ स्वरूप राखण्यास सहकार्य करण्याची विनंती संस्थेने केली आहे. विसर्जनाच्या वेळी जलस्रोतांमध्ये निर्माल्य, पूजेच्या इतर वस्तू, उदबत्तीचे पुडे, कापराच्या डब्या, प्रसादाचे द्रोण, खोके, सजावटीचे सामान किंवा केळीचे खांब आदी वस्तू फेकू नयेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे पाण्यात विघटन होत नाही, त्यामुळे अशा मूर्ती नैसर्गिक पाण्यात विसर्जित करू नयेत. शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करावे.
स्थानिक प्रशासनाने आणि सर्व वैयक्तिक व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन घाटावर निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.आणि संकलित निर्माल्य निवेदिता प्रतिष्ठानकडे पाठवावे, जेणेकरून त्याचा योग्य विनियोग करता येईल.
घरच्या देवांच्या निर्माल्यासोबत विसर्जन हाच आदर्श मार्ग आहे, असे मत निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत परांजपे यांनी व्यक्त केले आहे.
निवेदिता प्रतिष्ठानकडे दापोली परिसरातील अनेक मंदिरे आणि मठ यांच्याकडे निर्माण होणारे नित्याचे निर्माल्य संकलित केले जाते. या मंदिर आणि मठांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. याच धर्तीवर वैयक्तिक स्तरावरील सत्यनारायण पूजा, सार्वजनिक स्तरावरील सत्यनारायण पूजा किंवा कोणताही सण-समारंभांमध्ये निर्माण होणारे निर्माल्य संस्थेकडे सुपूर्द करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी