
उधमपूर, १७ सप्टेंबर (हिं.स.)जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे गुरुवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. रात्रभर चाललेल्या कारवाईनंतर हे यश मिळाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी रात्री उशिरा जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दहशतवादी हालचालींची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी रात्री सुमारे ९ वाजता माजलता येथील ब्राटेल सोन आणि खुब्बनच्या दुर्गम भागात लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्त शोध मोहीम सुरू केली.
त्यांनी सांगितले की, मोहीम सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात जंगलात गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले. सुरक्षा दल एका संशयित लपण्याच्या ठिकाणाला लक्ष्य करत होते, असे मानले जात आहे. या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले.
सुरक्षा दल जंगलात पोहोचल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी सैनिकांवर सात ते आठ रॉकेट डागले आणि पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर केला. पण सैनिक सतर्क राहिले आणि त्यांनी कारवाई करत दहशतवाद्यांना ठार केले. ही कारवाई सध्या सुरू आहे. जंगलात आणखी दहशतवादी लपून बसण्याची शक्यता आहे. चकमकीच्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले असून, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी संपूर्ण घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे