
नंदुरबार,, 18 सप्टेंबर (हिं.स.) महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव'
म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या विविध परंपरा, श्रद्धा, संस्कृती आणि
वैशिष्ट्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी 'Bappa.org' हा अधिकृत
डिजिटल मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाशी संबंधित विविध परंपरांचे डिजिटल
दस्तऐवजीकरण करून त्या पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यात येणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक
तसेच गणेशमंडळांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या बाप्पाशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण परंपरा
आणि आठवणी जगासमोर आणाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी आज पत्रकार
परिषदेत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आज सकाळी रंगावली सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.सेठी यांच्या
उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्यासह प्रिंट
व इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
आपल्या बाप्पाची कथा जगासमोर मांडा
नंदुरबार जिल्ह्याला विविध लोकपरंपरा, सांस्कृतिक वैविध्य आणि समृद्ध सामाजिक वारसा लाभला आहे.
जिल्ह्यातील शहरांबरोबरच ग्रामीण व दुर्गम भागातही गणेशोत्सव विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा
केला जातो. अनेक कुटुंबे आणि गणेश मंडळे पिढ्यानपिढ्या आपल्या पारंपरिक प्रथा जपत आहेत.
'Bappa.org' या डिजिटल मंचावर नागरिकांना आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी, अनुभव,
पारंपरिक प्रथा, आरत्या, छायाचित्रे, नैवेद्य व पाककृती तसेच उत्सवाशी संबंधित सांस्कृतिक वैशिष्ट्यांची
माहिती नोंदविता येणार आहे.
घरगुती किंवा सार्वजनिक गणेश मंडळातील आरतीचे ध्वनिचित्रमुद्रण, गणेशोत्सवाची छायाचित्रे,
पारंपरिक नैवेद्य व पाककृती, तसेच गणेशोत्सवाशी संबंधित विशेष परंपरांची माहिती नागरिक या
माध्यमातून शेअर करू शकतात.
आपल्या घरातील, गावातील आणि परिसरातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा 'Bappa.org' च्या
माध्यमातून जगासमोर आणाव्यात. आपल्या बाप्पाशी जोडलेल्या आठवणी, श्रद्धा आणि परंपरांचे डिजिटल
दस्तऐवजीकरण करून हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यासाठी जिल्हावासीयांनी मोठ्या
संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सेठी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर